पुणे: लॉकडाऊन आणि एसटीच्या संपामध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीने ग्रामीणमध्ये सुरू केलेले 11 मार्ग बंद केले आहेत. त्याबाबत एसटीनेच पीएमपीला पत्र दिले. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी अभ्यासपूर्ण सर्व माहिती घेतली, तर त्यांची निम्मी आंदोलने कमी होतील, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. ग्रामीण भागातील पीएमपीने बंद केलेले 11 मार्ग तत्काळ सुरू करावे, अन्यथा आंदोलन करू असा पवित्रा खासदार सुळे यांनी घेतला आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यांनी सुळे यांना शांत बसून सर्व माहिती घेण्याचा सल्ला दिला. एसटीच्या संप काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीकडून हे मार्ग सुरू करण्यात आले होते. आता एसटीची सेवा सुरू झाली असून, पीएमपीने हे मार्ग बंद करावे, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमपीएमएलच्या 11 मार्गावरील बस सेवा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करत गोरगरिबांची मुलं शिकावीत, असं वाटत नाही का, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आणि या सगळ्या मार्गांवरील बस सेवा सुरू ठेवा अन्यथा आपण स्वतः आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला होता.