14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अद्विक नाटेकर याला दुहेरी मुकुट – मुलींच्या गटात सिया प्रसादे हिला विजेतेपद
पुणे: नवसह्याद्री क्रीडा संकुल व एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत पुण्याच्या अद्विक नाटेकर याने एकेरी व दुहेरी या दोन्ही विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
एरंडवणा येथील नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीत 11वर्षीय दुसऱ्या मानांकित सिया प्रसादे हिने मानांकित खेळाडूंवर विजय मिळविणाऱ्या श्रीया देशपांडेचा 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1तास 45मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सियाने दुसऱ्याच गेममध्ये श्रीयाची सर्व्हिस रोखली व सामन्यात 2-0अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये सियाने पूर्णपणे वर्चस्व राखत 10व्या गेममध्ये सियाने श्रीयाची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा सहज जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्येदेखील श्रीयाला सूर गवसला नाही. या सेटमध्ये सियाने चौथ्या व सहाव्या गेममध्ये श्रीयाची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा सहज जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सिया ही अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून एम टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केतन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या वर्षातील या गटातील हे पहिलेच विजेतेपद पटकावले होते.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अद्विक नाटेकर याने बालावीर सिंग याचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. हा सामना 1तास 15मिनिटे चालला.
एकेरी गटाबरोबरच दुहेरीच्या अंतिम फेरीत अद्विक नाटेकर याने अभिराम निलाखेच्या साथीत अभय नागराजन व अर्चित धूत यांचा 6-3, 4-6, 14-12 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. अद्विक हा विखे पाटील मेमोरियल स्कुलमध्ये सातवी इयत्तेत शिकत असून नॅशनल सोसायटी टेनिस कोर्ट येथे प्रशिक्षक वरून मागीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. हे या वर्षातील या गटातील विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवसह्याद्री सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ, टेक-मार्क ऑटोमेशनचे राहुल कर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवसह्याद्री सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव विनायक करमरकर, टेनिस विभागाचे सचिव विनीत लिमये, स्पर्धा संचालक केतन धुमाळ, तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: मुली: अंतिम फेरी:
सिया प्रसादे(2)वि.वि.श्रीया देशपांडे 6-4, 6-2;
मुले: अद्विक नाटेकर(2)वि.वि.बालावीर सिंग(4) 6-4, 6-1;
दुहेरी गट: मुले:अंतिम फेरी:
अद्विक नाटेकर/अभिराम निलाखे वि.वि.अभय नागराजन/अर्चित धूत 6-3, 4-6, 14-12.