13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेचे पिंपरी चिंचवड येथे आयोजन
पिंपरी चिंचवड, 12 जानेवारी: महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेचे आयोजन येत्या 14 ते 18 जानेवारी दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी व वडाचीवाडी फायरींग रेंज उंड्री येथे करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना राज्याचे पोलीस उपमहासंचालक आणि संयोजन समिती अध्यक्ष एस.के.जैस्वाल म्हणाले की, या स्पर्धेमुळे पोलीस दलातील गुणवान क्रीडा पटू शोधून काढण्यास आणि त्यांना भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे. अशा महत्वाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने नेहमीच सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत आणि आम्ही यावेळी प्रयत्नांत कोणतीही कसर केलेली नाही.
पत्रकारांशी बोलताना पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त व संयोजन समिती सदस्य संदीप बिष्णोई म्हणाले की, या स्पर्धेचे यजमानपद भूषवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. पोलीस दलातील समन्वय वाढवण्यासाठी त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी, तसेच त्यांची तंदरुस्ती नेतृत्व गुण यांचा विकास करण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.
या स्पर्धेत देशभरातुन सहभागी होणाऱ्या पुरुष व महिलांच्या 26 संघांमध्ये 10, 25, 50 व 300 मीटर गटांमध्ये चुरस रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्वात मोठे पथक बीएसएफ इंदोरचे असून त्यात 52 नेमबाजांचा समावेश आहे. त्यानंतर सीआरपीएफ दिल्ली 57 नेमबाज आणि यजमान महाराष्ट्र 37 नेमबाजांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
तसेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अव्वल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता एअर पिस्तुल नेमबाज समरेश जंग(सीआयएसएफ), बिजिंग मध्ये ऑलिम्पिकमध्ये 10मीटर एअर रायफल गटांत भारताचे प्रतिनिधित्व करणारी अवणीत कौर सिद्धू, तसेच पंजाब पोलीसमध्ये कार्यरत असलेली आणि महिलांच्या 50 मीटर 3 प्रोनमधील भारताची अव्वल नेमबाजपटू अंजुम मौदगील यांचा समावेश आहे. याचबरोबर ग्रेनेडा विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 50मी रायफल थ्री पोजिशन गटातील रौप्य पदक विजेती लज्जा गोस्वामी(गुजरात पोलीस) आणि याच गटातील आंतरराष्ट्रीय नेमबाज एलिझाबेथ सुशांत कोशी(केरळ पोलीस) यांचेही कौशल्य या स्पर्धेत पणाला लागणार आहे.
स्पर्धेत याशिवाय विशेकरून पुरुष व महिला गटांतील सर्वोत्तम शूटर पुरस्कार विजेत्याला वॉलथर एअर पिस्तुल पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या संयोजन समितीत पिंपरी चिंचवड च पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासन विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजीव कुमार सिंघल, प्रविण कुमार सहसंचालक आय.बी.को डायरेक्टर आणि सेक्रेटरी ए.आय.पी.सी.नवी दिल्ली,पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि संयोजन सचिव रामनाथ पोकळे व सुधीर हिरेमठ पोलिस उपआयुक्त (गुन्हे शाखा व मुख्यालय) पिंपरी चिंचवड यांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीत सीआरपीएफचे निवृत्त महासंचालक टीएस धील्लन यांच्या अध्यक्षतेखाली तामिळनाडूचे निवृत्त अतिरिक्त पोलीस अधिक्षक आर.पी. इलँगो आणि नवी दिल्ली येथील बीएसएफचे डेप्युटी कमांडंट हरी प्रकाश यांचा समावेश आहे. अर्जुन पुरस्कार विजेती नेमबाज अंजली भागवत 25 मिटर एअर रायफल शुटींग या प्रकारात तांत्रीक प्रमुख म्हणुन काम पाहतील.
पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व संयोजन सचिव रामनाथ पोकळे यावेळी म्हणाले की, ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करण्यासाठी बहुमोल साहाय्य केल्याबद्दल आम्ही मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स पाईप्स, आदित्य बिर्ला मेमोरीयल हॉस्पिटल, विक्रम काकडे शूटिंग अकादमी, बीके डेव्हलपर्स आणि कोहिनुर यांचे आभार मानतो.
या स्पर्धेचे उदघाटन 14 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे पोलीस उपमहासंचालक एस.के. जैस्वाल यांच्या हस्ते होणार असून राज्याचे माजी पोलीस महासंचालक ए.व्ही.कृष्णन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले. स्पर्धेचा समारोप 18 जानेवारी 2020रोजी संध्याकाळी 4 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उप-मुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते होणार आहे.