पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत सिक्स रेड राज्यस्तरीय स्नूकर स्पर्धेतील विजेता पुण्याच्या शिवम अरोरा याने आपली विजयी मालिका कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत पुण्याच्या शिवम अरोरा याने मुंबईच्या अभिषेक बजाजचा 4-2(74(61)-01, 57(50)-10, 24-72, 21-66, 59-09, 89(62)-00) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 1तास 45मिनिटे चाललेल्या या सामन्यात शिवमने सुरेख सुरुवात करत पहिल्या दोन्ही फ्रेम अभिषेकविरुद्ध 74(61)-01, 57(50)-10 असा पराभव करून आघाडी घेतली. शिवमने आपल्या खेळीत पहिल्या व दुसऱ्या फ्रेममध्ये अनुक्रमे 61 व 50 गुणांचा ब्रेक नोंदविला. त्यानंतर आघाडीवर असलेल्या शिवमने काही निर्णायक क्षणी चुका केल्या व याचाच फायदा घेत अभिषेकने पुढील दोन्ही फ्रेम 72-24, 66-21 असा जिंकून बरोबरी साधली. शिवमने आपले अनुभव व कौशल्यचा वापर करत अभिषेकविरुद्ध दोन्ही फ्रेम 59-09, 89(62)-00) अशा जिंकून विजय मिळवला.
विजेतेपदानंतर बोलताना शिवम अरोरा म्हणाला कि, माझे हे या महिन्यातील सलग दुसरे विजेतेपद असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल जरी 4-2 असा असला तरी, अभिषेकने कडवी झुंज दिली. सामन्यात मी सातत्याने 50 गुणांच्या वर तीन वेळा ब्रेक नोंदविला ही माझ्यासाठी जमेची बाजू ठरली. या विजयामुळे 2020 मध्ये जानेवारी होणाऱ्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी देखील माझ्यावर आली आहे.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आनंद रघुवंशी याने स्पर्श फेरवानीचा 3-2(60-47, 47-59, 53-68, 80-46, 72-47) असा संघर्षपूर्ण पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
आगामी 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्र संघात हसन बदामी, चिराग रामकृष्णन, अभिषेक बजाज, विशाल वाया, शिवम अरोरा, शाहबाज खान, रयान राझमी, आनंद रघुवंशी यांचा समावेश आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीएसएएमचे अध्यक्ष राजन खिंवसरा, डेक्कन जिमखानाच्या सल्लागार समितीचे सदस्य संजीव ताटके, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव तन्मय आगाशे, सलील देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. बीएसएएमचे सचिव रिषभ कुमार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
शिवम अरोरा(पुणे)वि.वि.अभिषेक बजाज(मुंबई)4-2(74(61)-01, 57(50)-10, 24-72, 21-66, 59-09, 89(62)-00);
3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी:
आनंद रघुवंशी(मुंबई)वि.वि.स्पर्श फेरवानी(मुंबई)3-2(60-47, 47-59, 53-68, 80-46, 72-47).