पुणे, 8 ऑगस्ट : लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल फुलगाव येथील विद्यार्थ्यांनी रविवारी पोलिसांसोबत आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी पोलिसांना मैत्रीचा धागा बांधून आंतरराष्ट्रीय मैत्रीचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ५० विद्यार्थ्यांनी लोणीकंद पोलिस स्टेशन येथे भेट देऊन पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मैत्रीचा धागा बांधला.
सततच्या धकाधकीच्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून पोलिस अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिस स्टेशन येथील कार्य, महिला सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सर्व माहिती उत्साहाने समजून घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पवार, पोलिस शिपाई रोहित काळे, सरडे, पीलाने यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डेनसिंग, लक्ष्मी कुलकर्णी, अर्जुन शिंदे, सुरेश पाटील, संकिता कुरले आदी उपस्थित होते.