विसर्जन मिरवणुकीतील गणेश रथांना अडथळा ठरणाऱ्या मेट्रोच्या पुला च्या विरोधात महापालिकेत अवतरले गणराज – मंडळ कार्यकर्त्यांचा घेराव कार्यालयात आणि नगरसेवकांचा सभागृहात – मग दिले महापौरांनी आदेश -लकडी पुलावरील मेट्रोच्या पुलाचे काम तातडीने थांबवा
पुणे- कॉंग्रेसचे गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी लेखी पत्रव्यवहार करून लकडी पुलावर होणाऱ्या मेट्रोच्या पुलामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा येईल हे लक्षात आणून दिल्यावरही काल रात्री येथील मेट्रोच्या पुलाचे काम घाइघाइने करण्याचा प्रयत्न होताच तो गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथे गलका करून थांबविल्यानंतर आज याच कार्यकर्त्यांनी गणेशाचे रूप धारण केलेल्या कार्यकर्त्यासह महापालिकेत प्रवेश केला . प्रवेश द्वारापासून सभागृहात हि अडवणूक सहन करून कार्यकर्त्यांनी अखेरीस महापौरांच्या दालनात महापौरांना गाठले आणि घेराव घातला . या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांना आपण लकडी पुलावरील हे मेट्रोचे काम मार्ग निघे पर्यंत तातडीने थांबविण्याचे आदेश देतो असे सांगितले तर सभागृहात देखील बागुलांसह दीपक मानकर भाजपा व्यतरिक्त अन्य सर्वच सदस्यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेण्याचा पवित्रा घेताच हेच आदेश महापौरांनी दिल्याचे स्पष्ट केले .
गणेश विसर्जन मिरवणुकीला संभाजी पुलावर उभारण्यात येणारा मेट्रो पुल अडथळा ठरत असल्याने, या पुलाच्या अन्य पर्यायाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत मेट्रो पुलाचे काम थांबविण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भव्य दिव्य रथांना, संभाजी पुलावर उभारण्यात येणारा मेट्रो पुल अडथळा ठरणार आहे. यामुळे शहरातील गणेश मंडळांनी या पुलास विरोध करीत मंगळवारी रात्री पुल उभारणीचे काम थांबविले होते. तर आज काही गणेश मंडळांनी व कार्यकर्त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात जाऊन या मेट्रो पुलाच्या कामास विरोध केला.
तर दुसरीकडे सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मेट्रो पुलाला जोरदार विरोध केला. या पुलाचे काम थांबविण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर येऊन या सदस्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू केला. संभाजी पुलावरून मेट्रो मार्ग निश्चित करताना, शहरातील जगप्रसिध्द अशा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचा विचार का केला गेला नाही असा प्रश्न उपस्थित करून, दीपक मानकर यांनी या पुलाला पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम थांबविण्याची मागणी केली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी तुमच्याप्रमाणे मी सुध्दा प्रथम गणेश मंडळाचा कार्यकर्ताच आहे. त्यामुळे सर्वांच्या भावना लक्षात घेऊन, गणेश विसर्जन मिरवणुकीतील येणाऱ्या मेट्रो पुलाच्या अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाईल व त्यातून सकारात्मक मार्ग काढला जाईल असे सांगितले़ तसेच ही बैठक होइपर्यंत, संभाजी पुलावरील मेट्रो पुलाचे काम थांबविण्याबाबतच्या सूचना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.