पुणे : पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज विज्ञान विभागाने बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादित केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यंदा शाळेचे शताब्दी वर्ष असल्याने हा क्षण आनंद द्विगुणित करणारा आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य व्ही. पी. गावडे, शिक्षक आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
विद्यालयातील विद्यार्थी अनुराग मांडके (८९.८३ टक्के), अथर्व खडलोया (८८.६७ टक्के) व शिव मोरे (८७.१७ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. तसेच भार्गव थार व यौहान पाठक यांनी मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयात २०० पैकी २०० गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.
सुनील रेडेकर म्हणाले, “पुणे विद्यार्थी गृह संस्थेने तळागाळातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे हे नेहमीच ध्येय मानले आहे. त्या ध्येयाशी प्रामाणिक राहून शिक्षण देण्याचे काम संस्था गेली ११३ वर्षे करीत आहे.”