पुणे-पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे तसेच दाट लोकवस्तीमध्ये त्यांना पेट्रोलिंग करता यावे, यासाठी पोलिसांना सायकली भेट देण्यात आल्या. महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे, अशा शब्दात पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बिडकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. सभागृह नेते बिडकर यांच्या विकास निधीतून समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच या भागात पेट्रोलिंग करण्यासाठी पोलिसांना दहा सायकली भेट देण्यात आल्या.
पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आणि सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन झाले. यावेळी परिमंडळ २ चे उपायुक्त सागर पाटील, फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर, आयर्न मॅन पदक विजेते ठरलेले कौस्तुभ राडकर, समर्थ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हणे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पोलिसांची आहे. कामाच्या ताण तणावामुळे पोलिसांचे आरोग्य आज बिघडत चालले आहे. आरोग्य चांगले राहावे, यासाठी अनेक जण सायकलचा वापर करण्याकडे वळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी या सायकल भेट देण्यात आल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले. सायकलवर पेट्रोलिंग करणारे समर्थ पोलिस स्टेशन हे राज्यातील पहिले ठरले आहे. हा उपक्रम अत्यंत चांगला असून या पोलिस स्टेशनबरोबरच इतर स्टेशनसाठी अशा पद्धतीचे उपक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षा सह पोलिस आयुक्त शिसवे यांनी व्यक्त केली. पोलिसांना सायकलचे वाटप झाल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. पण त्याच बरोबर सीसीटीव्ही देखील देण्यात आले असून यामुळे अनेक घडामोडी वर लक्ष ठेवण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.