पुणे, 23 : फर्ग्युसन महाविद्यालय व इतिहास संकलन समितीच्या (प. महाराष्ट्र) वतीने आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (आयसीएचआर) सहकार्याने ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद महाविद्यालयाच्या अॅम्फि-थिएटरमध्ये 26 आणि 27 जुलैला होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही परिषद होणार आहे. लोकमान्य टिळक – राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळ, चतुःसूत्री, पत्रकारिता, गीतारहस्य आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक या विषयांवरील संशोधन निबंध सादर केले जाणार आहेत.
येत्या मंगळवारी (दि. 26 जुलै) सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन होणार आहे. डेक्कन अभिमत विद्यापीठाच्या पुरातत्त्व विद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. गो. ब. देगलूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. गुरू घासिदास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक मोडक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रा. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत, मोहन शेटे, प्रा. विनय चाटी, डॉ. भूषण फडतरे, डॉ. आनंद दामले आणि डॉ. प्रसाद जोशी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. पी. जामखेडकर यांचे बुधवारी (दि. 27 जुलै) दुपारी तीन वाजता समारोप समारंभात बीजभाषण होणार आहे. आयसीएचआरचे सचिव डॉ. ओमजी उपाध्याय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. टिळक विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक, डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.