पुणे, ता. २२ : भारताने पाकिस्तानर १९७१ मध्ये मिळविलेल्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वर्णिम विजय ज्योतीचा आगमनाने आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. भारत माता की जय, जय हिंद आणि वंदे मातरमच्या जयघोषात ज्योतीचे स्वागत करण्यात आले. ज्योतीच्या स्वागतासाठी महाविद्यालयाने संगीत, नृत्य आणि वादनाचा समावेश असणार्या देशभक्तीपर विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लष्करी बॅंड पथकाच्या तालावर ज्योतीचे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिमाखदार स्वागत करण्यात आले. मुख्य इमारत परिसरात रमणबागेच्या ढोल पथकाने ज्योतीला मानवंदना दिली. त्यानंतर सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असणार्या ऐतिहासिक ॲफी थिएटर मध्ये ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. वीरमाता आणि वीरपत्नींचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या जयोस्तुते या गीताने सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा पोवाडा, पाकिस्तानवरील युद्धात भारताच्या विजयाच्या स्मृतींना उजाळा देणारी विशेष शाहिरी, विजयोत्सव करणारी समूह गीते आणि नृत्य, चक दे इंडियाचे सादरीकरण आणि ए मेरे वतन के लोगो या गीताने जवानांना वाहिलेली आदरांजली यामुळे निर्माण झालेल्या देशभक्तीच्या वातावरणात सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, जनरल हरमंदीप सिंग, एअर मार्शल भोजवानी, कर्नल सदानंद साळुंखे,श्रीमती सुमित चव्हाण, मेजर जनरल विवेक डोग्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.