पुणे- विकास प्रकल्प व शासनाच्या विविध योजना कार्यकर्त्यांनी अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन भाजप, सेना, आरपीआय, रासप व शिवसंग‘ाम महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी शिवाजीनगर व कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहरप्रमुख महादेव बाबर, समाजकल्याण राज्यममंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, प्रशांत बधे, अजय भोसले, परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, सतीश बहिरट, उमेश वाघ, जयप्रकाश पुरोहीत, संजय मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘महायुतीच्या कार्यकर्त्यांची काम करणारा कार्यकर्ता अशी ओळख आहे. केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणल्या. शहरातील नागरिकांना त्यांचा लाभ झाला. अशा लाभार्थ्यांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचले पाहिजे. तसेच विविध विकासकामांची माहिती पोहोचविली पाहिजे.’
देशहित जपणारे पक्ष एकत्र आले आहेत. विविध योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा. विरोधक गैरसमज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करा असे आवाहन श्री. गोगावले यांनी केले. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करा व त्याप्रमाणे काम करा असे श्री. बाबर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
प्रभाग घटक मानून कार्यकर्त्यांनी कामाचे नियोजन करावे. दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी असे आवाहन समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. नकारात्मक प्रचारात अडकून न राहाता मतदारांपर्यंत विकासकामे पोहोचविण्याचे आवाहन खासदार शिरोळे यांनी केले. गेल्या निवडणुकीत दिलेली बहुतेक आश्वासने महायुतीने पूर्ण केली आहेत. केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामाचे सूक्ष्म नियोजन करा असे आमदार काळे यांनी सांगितले.