.
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे घरेलू कामगार महिलांना रेनकोट भेट उपक्रमाचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी समारोप.
आहे रे वर्गाकडून नाही रे वर्गाला अविरत मदतीचा ओघ हीच आपली संस्कृती – संदीप खर्डेकर.
पुणे/ भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विगत महिनाभर घरेलू कामगार महिलांना रेनकोट भेट उपक्रम राबविण्यात येत होता. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डी पी रस्त्यावरील राजश्री शाहू वसाहत येथील भगिनींना रेनकोट भेट देऊन ह्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,माजी नगरसेवक जयंत भावे,भाजपा प्रभाग 13 चे अध्यक्ष राजेंद्र येडे, भटक्या विमुक्त आघाडीचे सुनील होलबोले, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ अथणीकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आहे रे घटकाकडून नाही रे घटकाला सतत मदतीचा ओघ सुरु रहावा आणि ज्याला ज्या गोष्टी ची गरज आहे ती ओळखून त्याला ती वस्तू दिली जावी असा संदेश आमचे गुरु आणि अविरत सेवाकार्यात मग्न असणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आणि त्यास अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन असे उपक्रम राबवत असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.आज जेव्हा धो धो पावसात ह्या भगिनी रेनकोट घालून पावसापासून स्वतः चा बचाव करताना दिसतात तेव्हा आपले सेवाकार्य सार्थकी झाल्याची भावना चित्त प्रसन्न करते असे ही खर्डेकर म्हणाले.
सत्कार्य करताना ते योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचले पाहिजे यावर माझा कटाक्ष असतो आणि म्हणून तुम्ही सर्वांनी कुटुंबातील इतर व्यक्तींना रेनकोट न देता स्वतः वापरावा असे माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.कष्टकरी महिला कुटुंबाला आधार देताना स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात असे दिसून येते त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
चंद्रकांतदादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व द्या असा जो संदेश दिला आहे त्यानुसारच सर्व कार्यकर्ते वाटचाल करत आहेत, मात्र क्रिएटिव्ह फाउंडेशन दादांच्या बरोबरीने प्रत्येक उपक्रम राबवत असते हे विशेष असल्याचे मत माजी नगरसेवक जयंत भावे यांनी व्यक्त केले. आज भर पावसात हा कार्यक्रम होतं असताना रेनकोट चे महत्व अधोरेखित होते असेही जयंत भावे म्हणाले. आमच्या वस्तीला भारतीय जनता पार्टी च्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमार्फत सतत मदत होतं असते आणि कोरोना काळातील मदत तर आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही असे राजेंद्र येडे म्हणाले. संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, राजेंद्र येडे यांनी स्वागत तर सुनील होलबोले यांनी आभार प्रदर्शन केले.