पुणे- -ई टॉयलेटचा ढोल पिटवून प्रसिद्धी मिळवून लोकांना आधुनिकतेचे आणि स्वच्छतेचे स्वप्ने दाखवून तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीचा अपव्यय करून उधळपट्टी केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे .
या संदर्भात त्यांनी सांगितले कि ,’२०१८ मध्ये अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून २१ सिटचे १५ ई टॉयलेट पुण्यात बसवण्यात आले. त्यासाठी दोन कोटी अठरा लाख खर्च झाले. महिलांच्या सार्वजनिक स्वच्तागृहाची पुण्यात कमतरता आहे. त्यामुळे महिलांना याचा प्रामुख्याने उपयोग होईल असा दावा तेव्हा केला गेला. ही ईटॉयलेट थेट घनकचरा विभागाशी इंटरनेट ने थेट जोडली गेली असल्याचे सांगितले जात होते. अशी अत्याधुनिक यंत्रणा असलेली सुविधा योग्य देखरेख नसेल तर कुचकामी ठरते हे सर्वांनाच माहित आहे. तरीही हि ईटॉयलेट बसवली गेली. परंतु यातील निम्मी टॉयलेट दोन वर्षापूर्वीच बंद पडली होती. आता उर्वरित टॉयलेट कुठे कॉइन बॉक्स बिघडल्याने ,तर कुठे सेन्सर बिघडले, पाणी नाही अश्या कारणामुळे बंद आहेत. १२ स्क्वेअर फुटाचे टॉयलेट साधारण १८००० रुपयात बांधले जाते व इतर खर्च धरून २५ ते ३० हजारात पूर्ण होऊ शकते पण ही एका सीटची ईटॉयलेट प्रत्येकी १० लाखपेक्षा अधिक रकमेला घेतली गेली. हा खर्च दिखावूपणासाठीच होता. ४ वर्षांनी ही ईटॉयलेट पूर्ण निकामी ठरली आहेत. आता तो पांढरा हत्ती आहे. त्याला चालू ठेवायचे तर अवाच्या सव्वा खर्च देखभाल दुरुस्ती वर होईल. यात कॉइन सिस्टीम असल्याने सामान्य घरातील महिला याचा वापर करायला बीचकतात. आज आम आदमी पार्टीच्या सतीश यादव , शंकर थोरात आदी कार्यकर्त्यांनी काही ई टॉयलेटची पाहणी केली असता , तिथे कचरा टाकलेला , दरवाजे बंद , कॉइन बॉक्स तोडलेले , घाण जमा झालेली आढळून आली. कोरोना काळात याचा फारसा वापरही झालेला नाही तरीही हि स्थिती आहे. त्यामुळे महानगर पालिका बांधत असलेली टॉयलेट परवडली पण हि नको अशी जनतेची भावना आढळून आली. त्यामुळे ‘जनतेचे सव्वा दोन कोटी अक्षरशः गटाराला मिळाले असून हि स्मार्ट सिटीची च्या अपयशाची स्मारके आहेत’ अशी टीका आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे. याबाबत संबंधित कंपनी व घनकचरा व्यवस्थापन विभाग यांची बैठक असल्याचे समजते. आयुक्तांनी दिखावूपणाच्या खर्चाला आतातरी चाप लावावा व महिलांना स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे.