पुणे, दि. 25 सप्टेंबर: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमी वादाची पार्श्वभूमी राहिली आहे. याच पार्श्वभूमीदरम्यान राज्यपालांनी चक्क शिवसेना उपनेत्यांची भेट घेतली आहे. भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेउन त्यांना “शिवसेना – अस्मिता, संघर्ष, वाटचाल” हे पुस्तक भेट दिले.
पुस्तक हातात पडताच राज्यपाल कोश्यारी ते वाचण्यासाठी उत्सुक होते आणि त्यांनी लगेचच दोन पाने वाचली देखील आणि संपुर्ण पुस्तक वाचण्यात रस असल्याचे म्हटले. “गेल्या 50 वर्षातील शिवसेनेचा प्रवास” याचे उत्तम वर्णन पुस्तकातील 21 अध्यायात आहेत.
तीस मिनिटांच्या दीर्घ चर्चेत दोघांमध्ये शिवसेनेचे झंझावाती नेतृत्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या करिष्म्याचा सेना-भाजप युतीला गेल्या दोन दशकात कसा फायदा झाला, यासह शिवसेनेची कामगार चळवळ व त्याचा आजवर विविध क्षेत्रांना झालेला फायदा यावर चर्चा केली. सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील याबद्दल राज्यपालांनी विश्वास व्यक्त केला.
डॉ. कुचिक हे महाराष्ट्राच्या किमान वेतन धोरण सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्याने राज्यपालांना किमान वेतन धोरण,नवीन यंत्रणा आणि अंमलबजावणीबद्दल समजावून सांगितले. असंघटित तसेच आयटी क्षेत्रातील विविध अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. त्याचबरोबर कोरोना काळ विशेषतः मजूर वर्गासाठी किती कठीण होता, हे अधोरेखित केले.
यावेळी प्रफुल सारडा आणि राहुल बोहरा उपस्थित होते.