पुणे, 19 मे 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या सार्थ बनसोडे याने तर, मुलींच्या गटात नागपूरच्या सेजल भुतडा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित ओमर सुमर याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या पुण्याच्या सिद्धार्थ मराठेचा 6-3, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुण्याच्या सार्थ बनसोडे याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित अनमोल नागपुरेचा 7-5, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत सार्थ समोर पाचव्या मानांकित ओमर सुमरचे आव्हान असणार आहे. सार्थ याने या स्पर्धेत आतापर्यंत तीन मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे.
मुलींच्या गटात चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सातव्या मानांकित सेजल भुतडा हिने पुण्याच्या क्वालिफायर प्रिशा शिंदेचा 1-6, 7-6(5), 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आठव्या मानांकित डेनिका फर्नांडो हिने सिद्धी खोतचे आव्हान 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले.
दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे या जोडीने पार्थ देवरुखकर व अर्जुन अभ्यंकर या अव्वल मानांकित जोडीचा 6-4, 7-6(1) असा तर, साहिल तांबट व अर्णव कोकणे यांनी ओमर सुमर व अनमोल नागपुरे यांचा सुपरटायब्रेकमध्ये 6-4, 1-6, 10-8 असा पराभव केला. मुलींच्या गटात प्रिशा शिंदेने वैष्णवी चौहानच्या साथीत श्रावणी देशमुख व सिद्धी खोत यांचा 3-6, 6-2, 11-9 असा तर, सेजल भुतडा व अभिलिप्सा मल्लिक यांनी निशिता देसाई व सोनिका जेडीश यांचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: मुले:ओमर सुमर(महा)[5]वि.वि.सिद्धार्थ मराठे(महा) 6-3, 6-3;सार्थ बनसोडे(महा)वि.वि.अनमोल नागपुरे(महा)[2]7-5, 6-3;
मुली:सेजल भुतडा(महा)[7]वि.वि.प्रिशा शिंदे(महा)1-6, 7-6(5), 6-3; डेनिका फर्नांडो(महा)[8]वि.वि.सिद्धी खोत(महा)6-1, 6-0;
दुहेरी:उपांत्य फेरी: मुले:सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे वि.वि.पार्थ देवरुखकर/अर्जुन अभ्यंकर[1] 6-4, 7-6(1);साहिल तांबट/अर्णव कोकणे[3] वि.वि.ओमर सुमर/अनमोल नागपुरे[2] 6-4, 1-6, 10-8;
मुली:प्रिशा शिंदे/वैष्णवी चौहान वि.वि.श्रावणी देशमुख/सिद्धी खोत 3-6, 6-2, 11-9; सेजल भुतडा/अभिलिप्सा मल्लिक वि.वि.निशिता देसाई/सोनिका जेडीश 6-0, 6-0.