‘कर्करोग निदानाची नवी तंत्रे’ विषयावर व्याख्यान
पुणे : मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्करोग निदानाची नवी तंत्रे‘ या विषयावर राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. अंजली शिरास यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २४ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता मयूर कॉलनीतील भारतीय शिक्षण शास्त्र संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन) येथे हे व्याख्यान होणार असून, सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
जगात दरवर्षी सुमारे दीड कोटी कर्करुग्णांची भर पडते. त्यामध्ये प्रामुख्याने फुप्फुसे, यकृत, जठर आणि स्तनाचा कर्करोग या रोगाचे रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. स्तनाचा कर्करोग दर चार महिलांमागे एका महिलेला झालेला आढळतो. अविकसित देशांमध्ये औषधोपचार करण्याच्या पद्धती आधुनिक नसल्यामुळे आणि कर्करोगाचे निदान बरेच उशिरा होत असते. केमोथेरपीच्या रासायनिक उपचारांमुळे शरीरातील कर्करोगाच्या गाठींवर नियंत्रण मिळवता येते. मात्र काही कर्करोगाच्या पेशी या नियंत्रणाच्या पलीकडे जातात आणि वाढत राहतात. हे नियंत्रित करण्यासाठी कोणत्या प्रकारची नवी तंत्रे सध्या वापरली जातात, याचा आढावा डॉ. अंजली शिरास घेणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे, असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. विनय र. र. यांनी केले आहे.