पुणे-27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवामध्ये संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या संगीत रंगभूमीवरील वाटचालीवर आधारित ‘मम सुखाची ठेव’ या चित्रफितीचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार भवन (कमिन्स हॉल), नवी पेठ, पुणे येथे आयोजित या कार्यक्रमात या चित्रफितीच्या निर्माती व दिग्दर्शिका दीप्ती भोगले आणि स्वत: कीर्ती शिलेदार उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या संस्थेस 74 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त कीर्ती शिलेदार आणि ‘मम सुखाची ठेव’ चित्रफितीची निर्मिती व दिग्दर्शन केल्यानिमित्त दीप्ती भोगले यांचा विशेष गौरव पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे या कार्यक्रमात केला जाणार आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कीर्ती शिलेदार यांची गायिका व अभिनेत्री अशी संगीत रंगभूमीवरील वाटचाल आणि त्यांचा स्वरप्रवास डिजिटल माध्यमाद्वारे रसिकांसमोर याद्वारे येत आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांनी स्थापन केलेल्या ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या संस्थेचा वर्धापनदिन आणि कीर्ती शिलेदार यांच्या संगीत रंगभूमीवरील सहा दशकांची कारकीर्द असे दुहेरी औचित्य साधून या चित्रफितीची निर्मिती व दिग्दर्शन दीप्ती भोगले यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे इव्हेंट कोऑर्डिनेशन सुनील महाजन, निकिता मोघे तसेच नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अमित बागुल, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर आणि राजू बागुल हे करणार आहेत. करोना परिस्थितीनंतरच्या निर्बंधांच्या अधीन राहून हा कार्यक्रम संपन्न होईल.