पुणे- कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाचा सन्मान करण्यात आला. येथील राजभवनात जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी हा सन्मान स्वीकारला. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनीही सरग आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले. सरग यांच्याकडे सध्या पुणे विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना काळात प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत अचूक आणि तात्काळ पोहोचवण्यात माहिती कार्यालय आघाडीवर होते. ‘लॉकडाऊन’मध्ये अधिकृत माहितीसाठी ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअप तसेच इ-मेल या माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यामुळे सोशल मिडीयावरील अफवांचे निराकरण करण्यास मदत झाली.