पुणे-पुण्यातील ‘नो हॉकर्स झोन’ असणार्या बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते मित्रमंडळ चौक
या मार्गावरील पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर पुणे महानगरपालिकेने नियम धाब्यावर बसवून
सुमारे 44 स्टॉल्स ठेवले आहेत. स्वारगेट चौकातील मेट्रो हबच्या कामामुळे तेथील हे स्टॉल्स
पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर स्थलांतरीत करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या
या बेकायदा कृत्यामुळे पाटील प्लाझा येथील दुकाने झाकून गेली असून त्यांच्या व्यवसायाचे
अतोनात नुकसान होत आहे. पुणे महानगपालिकेस वारंवार विनंती अर्ज करूनही हे स्टॉल्स तेथून
हलवले जात नाहीत यासाठी आता पुणे महानगरपालिकेस 2 दिवसांची मुदत आम्ही देत असून
पुणे महानगरपालिकेने अनधिकृतपणे उभारलेले हे स्टॉल्स न हटवल्यास तेथे रास्ता रोको
आंदोलन केले जाईल. यामुळे होणार्या वाहतूक कोंडीस संपूर्णपणे पुणे महानगपालिका जबाबदार
राहील असा इशारा पाटील प्लाझा येथील सर्व गाळेधारक सभासदांच्या वतीने तेथील हॉटेल
समिंद्राचे अंकुश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी डॉ. प्रशांत कर्णिक, रमेश शेट्टी,
नूतन चव्हाण, संदीप जोशी, प्रशांत तुणगे, समीर चितापुरे, मनिषा शहा, प्रकाश शहा इ. पाटील
प्लाझा गाळेधारक सभासद उपस्थित होते.
अंकुश भोसले यांनी सांगितले की, पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर स्वारगेट चौकातील
स्टॉल्स स्थलांतरीत करणे पुर्णतः बेकायदेशीर आहे. मुख्य म्हणजे हा संपूर्ण रस्ता ‘नो हॉकर्स
झोन’ आहे. फूटपाथ हे केवळ पादचार्यांसाठीच असून येथील फूटपाथवर असेच स्टॉल ठेवल्यामुळे
नागरीकांना मोठा त्रास सहण करावा लागत आहे. या वाहनांच्या गर्दीच्या रस्त्यावर त्यामुळे
अपघात वाढण्याची शक्यता आहे. तसेच पाटील प्लाझा मधील दुकाने या स्टॉल्समुळे झाकली
जात असून येथील दुकानदारांचे रोज अतोनात नुकसान होत आहे. अनेक दुकानदारांनी तर कर्ज
काढून दुकाने घेतली आहेत. मात्र आता या बेकायदा स्टॉलच्या गर्दीमुळे व्यवसाय कमालीचा कमी
झाला आहे. एवढेच नव्हे तर बँकांचे हप्ते भरणेही अशक्य झाले आहे असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, प्रारंभी स्वारगेट चौकातील हे स्टॉल्स सिंहगड रस्त्यावरील पु.ल.
देशपांडे उद्यानानजीक ठेवण्यात येणार होते. मात्र तेथे विरोध झाल्याने 9 मार्च 2019 रोजी
रातोरात हे स्टॉल्स पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर ठेवण्यात आले. तसेच त्यासाठी सिमेंट
काँक्रीटचे बांधकामही केले गेले. या प्रभाग क्र. 29 मधील नगरसेवकांनी देखील पुणे
महानगरपालिका अधिकार्यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी
मात्र या संदर्भात कोणतीच कारवाई करीत नसून ही केवळ तात्पुरती काही वर्षांसाठी तरतुद आहे
असे सांगून बोळवण करीत आहेत. न्यायालयाने फूटपाथवरील स्टॉल्स हटवण्याचे धोरण अंमलात
आणण्याचे आदेश देऊनही स्वतः पुणे महानगरपालिका या आदेशाची पायमल्ली करीत आहे ही
गंभीर बाब आहे. शहराचे विद्रुपीकरण करणार्या, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्या,
वाहतूकीस अडथळा आणणार्या, पादचार्यांची गैरसोय करणार्या आणि पाटील प्लाझामधील
227 गाळेधारक व्यावसायीकांचे आर्थिक नुकसान करणार्या पुणे महानगरपालिकेने हे स्टॉल्स
आजपासून 48 तासात न हटवल्यास पाटील प्लाझा गाळेधारक सभासद व कर्मचारी तेथे रास्ता
रोको आंदोलन करतील. यामुळे होणार्या वाहतूक कोंडीस सर्वस्वी पुणे महानगरपालिका जबाबदार
असेल असे अंकुश भोसले यांनी शेवटी सांगितले.