पुणे :दारू धंद्यांविरोधात तक्रार केली म्हणून छळ सुरु झालेल्या एका महिलेने पुण्याच्या पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी दारू धंद्यावर आणि तिचा छळ करणाऱ्यावर व संबधित पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली कि नाही हे समजू शकले नाही मात्र या तक्रारदार ३० वर्षीय महिलेवर मात्र बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या एका घटनेत गुरुवारी रात्रीच पिंपरीच्या पोलीस आयुक्तालयासमोरच दोन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे.
बेकायदेशीर दारूविक्रीबाबत पोलिसांना माहिती दिल्याने या महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. संबंधित महिला सिंहगड रस्ता येथील तुकाईनगरमध्ये राहते. त्या राहत असलेल्या ठिकाणी काही महिलांकडून बेकायदेशीर दारूविक्री केली जात असल्याची माहिती त्यांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संंबंधित ठिकाणी छापा टाकला होता. त्यामुळे दारू विक्री करणाºया महिलांकडून संबंधित महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. या त्रासाला तसेच
येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी तक्रार देण्यासाठी त्या पोलीस आयुक्तालयात गेल्या होत्या. मात्र त्यांनी तक्रार न देता आत्महदनाचा प्रयत्न केला.पिंपरी- चिंचवडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर रुप धारण करत असून गुरुवारी रात्री पोलीस आयुक्तालयासमोरच दोन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
गुरुवारी रात्री पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर अमोल वाल्हे आणि अप्पासाहेब कदम या तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ऍंथोजी फ्रान्सिस आणि रॉबिन फ्रान्सिस या दोघांनी हा हल्ला केल्याचे समजते. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर आरोपींनी कोयत्याने दोघांवर हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयासमोरच कोयत्याने हल्ला करण्याची मजल आरोपींनी गाठल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.