पुणे-:- खा.गिरीश बापट यांनी कोरोनाच्या कालावधीत केलेल्या कार्य अहवालाच्या हिंदी आवृतीचे प्रकाशन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे झाले. या अहवालात मी पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च -एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु झाला. कोरोनाच्या संसर्ग होऊ नये व त्याचा प्रादुर्भाव नियंत्रित राहावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी संचारबंदी लागू केली, नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जातांना मास्क वापरणे, सहा फुटाचे सामाजिक अंतर पाळणे, त्याप्रमाणे वेळोवेळी साबणाने 30 सेकंद हात धुणे व घरीच बसून सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या. कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचार, बेड्स उपलब्ध करून देणे, हे कार्य केंद्र, राज्य शासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद व शासकीय रुग्णालयांनी वेळोवेळी केले. पोलीस प्रशासन, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी यांनी या कालावधीत खरोखरच प्रशंसनीय असे कार्य केले. या कालावधीत हातावर पोट असणारे कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक यांनी आपली रोजीरोटी गमावली. त्यामुळे आर्थिक चक्रे थांबली. यावेळी खऱ्या अर्थाने माणुसकीची जाणीव ठेवून सामाजिक संस्था या मदतीला आल्या. सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने बारा बलुतेदार यांना तसेच रोजीरोटी गमावलेल्यांना आर्थिक मदत केली, त्यांची भोजनाची व्यवस्था केली. अन्नधान्याचे कीट देऊन मदत केली. त्यांची आरोग्य तपासणी केली. आपापला भाग निर्जंतुक केला व “डॉक्टर आपल्या दारी” योजना राबवली. अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप केले. मी अध्यक्ष असलेल्या श्री. ओंकारेश्वर देवस्थानच्या माध्यमातून रिक्षाचालक, बिडी व घर कामगार, बारा बलुतेदारांना व गो शाळांना मदत केली. तसेच मला खासदार म्हणून मिळालेल्या मानधनातूनही आर्थिक मदत केली. या कालावधीत स्थलांतरित मजुरांना परराज्यातील त्यांच्या गावाला रेल्वे, एसटी महामंडळाच्या बसने जाण्यासाठी रेल्वे व परिवहन मंत्री यांचेशी पत्रव्यवहार व संपर्क करून जाण्याची व्यवस्था केली. महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह इतर शहरातील नागरिक परदेशामध्ये अडकलेले होते. त्यांना “वंदे भारत मिशन” अंतर्गत भारतात आणण्यासाठी परराष्ट्रमंत्री यांच्याशी संवाद साधून आवश्यक व्यवस्था केली.
तसेच पालकमंत्री श्री अजित पवार यांना विनंती करून अधिकारी व पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय घडविण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यास विनंती केली. पुण्याचा कोरोना नियंत्रणात यावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी मी वेळोवेळी संपर्क केला. त्याचप्रमाणे संसदेत देखील याबाबत शासनाचे लक्ष वेधले.
या घटनांची माहिती पुणेकरांसमोर ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी हा कार्य अहवाल तयार केला आहे. सध्या मी दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी हजर असल्याने या अहवालाच्या हिंदी आवृत्तीची पहिली प्रत लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांना देवून त्यांच्या हस्ते काल प्रकाशन करण्यात आले. या अहवालाची मराठी आवृत्ती लवकरच पुणेकरांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.