पुणे : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलांकडून सोमवारी (ता.२४) काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला. लोकायतच्या वकील विंग समतेसाठी शहरातील काही वकील संघटना यात सहभागी झाल्या होत्याअॅड. भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत नुकतेच दोषी ठरवण्यात आले आहेवकिलांनी या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत म्हटले आहे की, ऍड. भूषण यांची विधाने अयोग्य, तर्कविसंगत असू शकतात. परंतु यातून न्यायालयाची अवमानना होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत तत्परतेने निर्णय देत त्यांना दोषी ठरवले. न्यायव्यवस्थेवर टीका करणे म्हणजे तिचा अपमान करणे आहे का? टीका करणे म्हणजे अपमान करणे नाही. संविधानाच्या कलम १९ (१)(A) नुसार देशातील प्रत्येक नागरिकास भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. ऍड. भूषण यांच्यावरील कारवाई ही एक प्रकार या हक्काची पायमल्ली होत आहे.
ऍड. मोहन वाडेकर, ऍड. शाहिद अख्तर, ऍड. नाथा शिंगाडे, ऍड. मोनाली चं. अ., ऍड. प्रभाकर सोनवणे, ऍड. वाजीद खान, ऍड. आरिफ खान, ऍड. सुषमा नामदास, ऍड. अतुल गुंड-पाटील, ऍड. सैफान शेख यांच्यासह लोकायतची वकील विंग आणि शहरातील काही वकील संघटना सभेत सहभागी झाल्या होत्या.
संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्ही बोलतोय. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आम्ही ती घेत आहोत, असे सभेत सहभागी झालेल्या वकीलांनी सांगितले.