पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत . या दिवशी गांधीजींच्या जीवनकार्यावरील फोटो प्रदर्शन, तिकिटांचे प्रदर्शन ,भजन, डॉ कुमार सप्तर्षी यांचे व्याख्यान, ‘गांधी ‘ चित्रपट , खादी वस्तूंचे प्रदर्शन असे कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन , कोथरुड ) येथे होणार आहेत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि सचिव अन्वर राजन यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यांनतर सर्वधर्मप्रार्थना ,शुभांगी मुळे यांचे भजन होणार आहे . गांधीजींच्या जीवनकार्यावरील फोटोचे .टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचे उदघाटन सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. ‘महात्मा गांधींच्या विचारांचा वर्तमान काळातील संदर्भ ‘ या विषयावर डॉ कुमार सप्तर्षी यांचे व्याख्यान ११ वाजता होईल . दुपारी साडेबारा वाजता ‘गांधी’ हा ऑस्कर विजेता चित्रपट गांधी भवन मधील मिनी थिएटर मध्ये दाखविण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या काळात गांधीभवन आवारात खादी आणि विविध वस्तूंचे, स्टॉल्सचे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सुरु राहणार आहे.