‘कौशल्य विकासातून ग्रामीण रोजगार निर्मिती’ विषयावर होणार चर्चा
पुणे:स्टार्स फोरम (स्किल्स ट्रेनिंग फॉर एडव्हान्समेंट इन रुरल सोसायटीज) या फोरम तर्फे ‘ ग्रामीण कौशल्याच्या विकासाचे पुनरावलोकन – धोरण व सराव’ या विषयावर दहावी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून ‘बाएफ ‘ संस्था ( वारजे, पुणे) येथे ६-७ डिसेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेला देशविदेशातून शिक्षण ,रोजगार ,ग्रामविकास क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्टार्स फोरम चे अध्यक्ष डॉ योगेश कुलकर्णी , कार्यकारी संचालक चैतन्य नाडकर्णी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली .
६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता परिषदेचे उद्घाटन होणार आहे.उद्घाटनपर पहिल्या सत्रात ‘ग्रामीण भारतातील कौशल्ये प्रशिक्षणाचे प्रयोग ‘ या विषयावर चर्चासत्र होणार आहे .’बाएफ’ संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश सोहनी ,’युवा परिवर्तन ‘ संस्थेच्या सह संस्थापक मृणालिनी खेर, राजीव गांधी सायन्स -टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव अनिल मणेकर,’कॉर्ड ‘ संस्थेच्या संचालक डॉ .क्षमा म्हेत्रे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत .
या परिषदेच्या दोन दिवसातील चर्चासत्रात आर .श्रीधर,लक्ष्मीकांत माळवदकर,डॉ रघुराम दास ,प्रवीण महाजन ,वैभव काळे ,सुभाष देशपांडे,अजय कुमार ,डॉ संदीप देशमुख ,पंकज सिंह ,डॉ दिनेश अवस्थी ,अमीर सुलतान ,कुलभूषण बिरनाळे,नरेंद्र कराळे,डॉ सुधा कोठारी ,डॉ विवेक सावंत ,डॉ उन्नत पंडित ,रोहित सरोज ,हेमंत गाडगीळ ,रिटा सेनगुप्ता सहभागी होणार आहेत .
मागील दहा वर्षात स्टार्स फोरमने अनेक राष्ट्रीय परिषदा, औद्योगिक कौशल्य विकासपर प्रशिक्षण कार्यक्रम आयॊजित केले आहेत. सर्व समाजेवी संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणे व विविध कौशल्यांची देवाण घेवाण करणे हा या फोरमचा उद्देश आहे. आजपर्यंत देशभरातून १०० हुन अधिक संस्था या प्रयत्नात सहभागी झाल्या आहेत.
ग्राम विकास व उपजीविका या क्षेत्रात काम करणा-या संस्थानी, एकत्र प्रयत्न करुन ग्रामीण रोजगार निर्मितीकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या विषयातील विचार व कल्पना यांची देवाण- घेवाण करण्यासाठी STARS Forum (Skills Training for Advancement in Rural Societies)- स्टार्स फोरम हि संस्था २०१० साली स्थापन झाली. ग्रामीण व निमशहरी लोकांमध्ये असलेल्या कौशल्याचा योग्य वापर करून त्यांच्याकरता उपजीविका निर्माण करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणणे व त्यांना समान व्यासपीठ मिळवून देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी स्टार्स फोरम आपली दहावी वार्षिक राष्ट्रीय परिषद पुणे येथील ‘बाएफ’ संस्थेमध्ये ६ व ७ डिसेम्बर रोजी आयोजित करत आहे.
कारखान्यामधून जास्त उत्पादन तयार करणे व त्याचे विपणन यामुळे केँद्रित पध्दतीची उत्पादन पध्दती विकसित झाली आहे. मात्र, नवीन तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती यामुळे विकेंद्रित उत्पादन किंवा गाव पातळीवर उत्पादन आता शक्य होत आहे. तसेच नवीन काळात गाव पातळीवर अनेक उद्योग संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे गरजू विद्यार्थी, महिला, असंघटीत युवक- युवती ,भूमिहीन शेतकरी जे चांगली उपजीविका मिळण्यापासून दूर आहेत; अशा लोकांना एकत्रित आणून स्थानिक व्यावसायिक कौशल्यांच्या आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यास मदत करणे यासाठी स्टार्स फोरम प्रयत्न करत आहे.