भारतीय विद्या भवन’मध्ये रंगले ‘गायन सतार ‘ सहवादन
भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फौंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद
पुणे :‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गायन सतार’ या सहवादनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २८ जून २०१९ रोजी ‘भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, (सेनापती बापट रस्ता ) येथे सायंकाळी ६ वाजता झाला.
उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य आणि सतारवादक समीप कुलकर्णी यांनी बहारदार सतारवादन केले तर सौरभ काडगावकर यांनी मैफलीत गायकी चे रंग भरले. त्यांना तबल्यावर अरविंद परांजपे ,हार्मोनियमवर सुखदा खरे यांनी साथसंगत केली. स्नेहा रानडे यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
समीप कुलकर्णी यांनी सुरूवातीला एकल प्रस्तुतीत सतारीवर बिहाग राग विलंबित रुपक द्रूत ताल पेश केला. एकल गायनात सौरभ काडगावकर यांनी राग पुरिया धनश्री प्रस्तुत केला.नंतर ‘ कैसे दिन कठीण ‘, ही बंदीश, ‘ पायलिया झंकार ‘ ही रचना पेश केली.
सहगायनात दोघांनी मिळून हंसध्वनी राग सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. ‘विघ्न हर गणपती गजानन ‘ , ‘लागी लगन ‘या पेशकशीसह तराणा सादर केला.. सौरभ काडगावकर यांनी भैरवी रागातील ‘अवघा रंग एक झाला ‘ हे भजन सादर केले आणि भक्तीरंगही भरलेल्या मैफलीची सांगता झाली.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत झालेला हा ७७ वा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
मुख्याध्यापक अपर्णा दास यांनी कलाकारांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार केला.