लोकसभेच्या इच्छुकांच्या दिवाळी फराळनिमित्त भेटीगाठी!
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार दिवाळी फराळाच्या निमित्ताने भेटीगाठी घेण्याचा मुहूर्त साधताना सध्या दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या राज्यसभा खासदार संजय काकडे व शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची दिवाळी फराळनिमित्त भेट झाली आणि त्यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेमुळे भाजपतील अंतर्गत शर्यतीला कोणता ‘टर्न’ मिळणार? यामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांना शह बसेल का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पालकमंत्री गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांच्यातील सत्ता संघर्ष आता लपून राहिला नाही. लोकसभेसाठी दोघा नेत्यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. मात्र, भाजपतील इच्छुकांच्या यादीत या दोघांबरोबर भाजप पुणे चे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचे नावही सामील झाले. तेव्हापासून पालकमंत्री बापट गोगावले यांना जमेल तसं राजकीय दृष्ट्या ‘कॉर्नर’ करु लागले. महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात खासदार काकडे यांचे योगदान भाजपचे वरिष्ठ नेते देखील नाकारु शकत नाहीत. त्याचवेळी शहराध्यक्ष म्हणून आतापर्यंत बजावलेली भूमिका समर्थपणे पेलल्याचे दाखवून गोगावलेंनीही इच्छुकांच्या यादीत आघाडीवरच असल्याचे आतापर्यंत नकळतपणे दाखविण्याचा प्रयत्न सातत्याने ठेवला आहे.
नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी दिवाळीनिमित्त फराळाचे आयोजन केले होते. याला भाजपची बहुतांश नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी एकत्र आलेल्या खासदार काकडे व शहराध्यक्ष गोगावले यांच्यात राजकीय गुप्तगु झाल्याची चर्चा लगेचच सर्वदूर पसरली. ‘शत्रुचा शत्रू, तो आपला मित्र’ याप्रमाणे बापटांना शह देण्यासाठी काकडे व गोगावले एकत्र येणार का? या बैठकीचे परिणाम शहरातील व महापालिकेतील सत्ताकारणात दिसणार का? हे येणारा काळच सांगेल.
पालकमंत्री म्हणून गिरीश बापट व शहराध्यक्ष म्हणून योगेश गोगावले यांनी सुरुवातीची काही महिने एकत्रितपणे कारभार हाकला. परंतु, लोकसभेचे वारे वाहु लागताच व गोगावलेंची इच्छुकांच्या यादीत समावेश होताच शह-काटशहाचं लाजकारण सुरु झाले. यातूनच गोगावलेंनी खासदार काकडे यांच्याशी जवळीक साधल्याचे बोलले जात आहे. काकडेंच्या सहकार्याने भाजपचे हेडमास्तर म्हणून ओळखले जाणारे गोगावले आता पुढचे राजकारण कसे करणार हे लवकरच स्पष्ट होईल.