पुणे-कोथरूडमधील हॅप्पी कॉलनी परिसरात पोलिस चौकी उभारणीची मागणी इथल्या नागरिकांकडून सातत्याने होत होती.यासाठी हॅपी कॉलनी फेडरेशनच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले होते.या बाबत आज आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासमवेत नागरिकांची विस्तृत बैठक आयोजित केली होती. यावेळी नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी विविध पर्यायांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.यात प्रामुख्याने पोलिस खात्याकडून परवानगी मिळाल्यावर तेथे लवकरच पोलीस चौकी कार्यान्वित करु असे आश्वासन पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले.
या बैठकीत श्री. पाटील यांनी कोथरूड मधील हॅप्पी कॉलनी हा अतिशय शांत परिसर असून, काही समाजकंटकांकडून सातत्याने इथली शांतता भंग केली जात असल्याचे पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर कोथरूड मध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.तसेच हॅपी कॉलनी व गोसावी वस्तीतील नागरिक मूठभर समाजकंटकांच्या कारवायांना त्रासले आहेत,म्हणून लवकरच हॅपी कॉलनी व गोसावी वस्तीतील शांतताप्रिय नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करुन यावर उपाययोजना करण्यात येइल असेही पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,स्थानिक नगरसेवक आणि भाजप सरचिटणीस दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सौ.माधुरीताई सहस्रबुद्धे,जयंत भावे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांच्या सह हॅपी कॉलनी फेडरेशन चे अध्यक्ष संजय मिसाळ,सचिव चिन्मय गोगटे,श्री.सुरेश मालशे,श्री.अवधूत जोहारी,शांभवी गारगोटे,हिमानी पटवर्धन,मिलिंद ओगले,सौरभ अथणीकर व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
यावेळी आ.चंद्रकांतदादांनी एकूणच तरुण वर्ग गुन्हेगारी कडे वळत असून त्यांना त्या क्षेत्राचे आकर्षण वाटते यासाठी पोलिस खात्याकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली.तरुणच नव्हे तर अगदी कोवळ्या वयातील मुले संघटित गुन्हेगारीला बळी पडत असून त्यांची उर्जा सकारात्मकतेने वापरली पाहिजे यावर आ.चंद्रकांतदादा पाटील व पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी चर्चा केली व ह्या मुलांसाठी कृती आराखडा तयार करुन त्यांच्या उर्जेला विविध खेळांच्या माध्यमातून सकारात्मक वापर करण्याबाबत एकमत झाले.या उपक्रमास सर्वतोपरी साहाय्य करण्याचे वचन ही चंद्रकांतदादांनी दिले.