सौरभ राव यांच्या कारभाराबाबत सेनेचे नाना भानगिरे यांची नाराजी
प्रभाग 26 मधील नागरी समस्यांबाबत आयुक्तांचे वेधले लक्ष
नगरसेवक नाना भानगिरे यांची शिष्टमंडळासाह पालिकेत बैठक
पुणे-प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी कौसरबाग परिसरातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला आहे याबाबत महापालिकेत वारंवार निवेदन देऊन आंदोलने करून लक्ष वेधूनही प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी-कौसरबाग मधील विविध समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून यासंदर्भात नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त सौरभ राव यांची पालिकेत भेट घेऊन चर्चा केली.
तसेच लेखी निवेदन देऊन या प्रभागातील समस्यांबाबत तातडीने संबंधित विभागांना कार्यवाहीचे आदेश द्यावेत अशी मागणी केली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनामध्ये नगरसेवक भानगिरे यांनी म्हटले आहे,
प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी प्रभाग परिसरातील हांडेवाडी रोड, चिंतामणी नगर, बडदे मळा, साई विहार कॉलनी, न्याती सोसायटी, परिसरामध्ये अनेक वर्ष अनियमित पाणीपुरवठा होत आहे, दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी वारंवार तक्रार केली तसेच येथील समस्यांबाबत आंदोलने देखील केलेली आहेत परंतु याबाबत गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याने प्रभागात नागरिकांच्या संतप्त भावनांना तोंड द्यावे लागत आहे.
या प्रभागात दिवसेंदिवस डुकरांचे प्रमाण वाढत चालले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक डुकरांनी नागरिकांवर हल्ले देखील केले आहेत त्यामुळे भीतीचे वातावरण आहे त्यामुळे तातडीने संबंधित विभागाला सूचना देऊन डुक्कर मुक्त प्रभाग करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे.
हांडेवाडी रोड हा मुख्य रस्ता व पथारी व्यावसायिकांनी गजबजलेला असतो त्यामुळे रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे हा रस्ता अरुंद असल्यामुळे लवकरात लवकर रुंदीकरण करून येथील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा. तसेच प्रभाग क्रमांक 26 मधील सर्व नंबर 72/ 73 मधील पालखी रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे परंतु याठिकाणी रिटेनिंग वॉल व कलवटचे काम संदीप पटेल या ठेकेदाराकडून संथ गतीने होत आहे, तक्रार करूनही ठेकेदाराकडून कामाबाबत गांभीर्याने उपाययोजना केली जात नाही त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून तातडीने काम पूर्ण झाल्यास कृष्णानगर, सय्यदनगर रेल्वे गेटचा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रभाग क्रमांक 26 मधील सर्वे नंबर 42, 43, 46 याठिकाणी काऊन नाइन सोसायटी आहे या सोसायटीचे एस.टी.पी चे पाणी संपूर्ण रस्त्यावर येत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे, ड्रेनेजच्या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे येथे ड्रेनेजवाहिनी नसल्यामुळे पर्यायी बिल्डरच्या जागेचं नवीन ड्रेनेज लाईन टाकून त्या ठिकाणचा प्रश्न सुटणार आहे.
या प्रभागात 24×7 च्या माध्यमातून जे काम चालू आहे ते संथ गतीने सुरू असल्याने जागोजागी खोदाईमुळे खड्डे पडले आहेत त्यामुळे महंमदवाडी रोड हांडेवाडी येथील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशीही मागणी या निवेदनात नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी केली आहे. यावेळी नगरसेविका संगीता ठोसर, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट आदी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
यासंदर्भात महापालिक आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रभाग क्रमांक 26 मधील नागरी प्रश्नांबाबत उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले आहे. सर्व खाते प्रमुखांना तातडीने बोलावून येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबर डुकरांची कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रभागातील हांडेवादी रोड, कृष्णानगर व इतर रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले आहेत.