पुणे- शहरातील सहा मीटर व साडेसात मीटर रुंदीचे असलेले सुमारे 103 किलोमीटर लांबीचे 323 रस्ते 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीचे करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर मांडला आहे येथील असलेल्या वाड्यांचा ,बांधकामांचे रखडलेले प्रकल्प सुरु व्हावेत ,तिथे टीडीआर द्वारे अधिक चे बांधकामे व्हावीत आणि त्यातून पालिकेला महसूल मिळावा या हेतूनेच हा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे.
नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी नाही. त्यामुळे अनेक जुन्या इमारती, जुने वाडे, सोसायट्यांचा विकास रखडला आहे. अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. अशा इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागावा, तसेच महापालिकेचे उत्पन्न देखील वाढावे, या हेतूने प्रशासनाकडून 210 कलमाखाली या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाने सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका.
2016 मध्ये राज्य सरकारने नव्याने टीडीआर लागू केले. त्यामध्ये कमीत कमी नऊ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्याच रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचे बंधन महापालिकेवर घातले. त्यातून हा प्रश्न निर्माण झाला होता. पुणे शहरात नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांची संख्या ही जवळपास साठ ते सत्तर टक्के आहे. या सर्व ठिकाणच्या इमारती, वाडे, जुन्या सोसायट्यांच्या वाढीव बांधकाम पुनर्विकासाला त्यामुळे खो बसला होता.जुन्या हद्दीचा नव्याने विकास आराखडा तयार करून चूक दुरुस्तीचा प्रयत्न महापालिकेकडून झाला. परंतु तत्कालीन राज्य सरकारने ते हाणून पाडला होता. शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून ते नऊ मीटरपर्यंत करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर शहरातील काही हजार बांधकामांना याचा फायदा मिळणार आहे. शहराच्या आणि उपनगरांच्या गजबजलेल्या अरुंद रस्त्यावरील बांधकामांची पुनर्बांधणी होऊन त्यांची उंची वाढनार आहे.
कोविड-19 मुळे बांधकाम क्षेत्राला मरगळ आली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर देखील झाला आहे. या क्षेत्राला पुन्हा संजीवनी देण्यासाठी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या रस्त्यांवर टीडीआर आणि प्रिमिअम एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे.