पुणे – पुणेकरांना 24 तास शुध्द पाणी पुरविण्याकरिता आखलेल्या योजनेतर्गंत या वर्षी देखील पाणीपट्टीत 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजूर झाला. ही वाढ पुढील आर्थिक वर्षापासून लागू होईल. नव्या निर्णयानुसार पुणेकरांना वर्षाकाठी दीड ते चार हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, लोकांना रोज अपुरे पाणी मिळत आहेत, 24 तास पाणीपुरवठा योजनेला गती नसल्याने पाणीपट्टीत वाढ करू नये, असा आग्रह सदस्यांनी धरला
पाणीपुरवठा योजनेसाठी मागील वर्षापासून पाच टप्प्यांत पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने 2016 मध्ये घेतला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी 12 टक्के, पुढील चार वर्षे प्रत्येकी 15 टक्के वाढ करण्यात येणार आहे.
पाणी पट्टीत अडीचशे ते पावणेतीनशे रुपयांनी, तर बिगर निवासी मिळकतींमध्ये पाचशे रुपयांनी वाढ होणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय आराखड्यात मिळकतकरात १२ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ सुचविली होती. स्थायी समितीने मिळकतकरातील वाढ फेटाळून लावली होती; पण 24 पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपट्टीत वाढ करण्यास मंजुरी दिली होती. सर्वसाधारण सभेने त्यावर मोहोर उमटविल्याने पुणेकरांच्या करात वाढ होणार नसली, तरी आगामी वर्षाच्या बिलांमध्ये पाणीपट्टीत वाढ होणारच आहे. महापालिकेच्या मंगळवारच्या सभेत पाणीपट्टीत वाढ करण्याच्या निर्णयाला विरोधकांनी आक्षेप घेतला. शहरात अजूनही अनेक भागांत पुरेसे पाणी मिळत नसताना पुणेकरांवर लादलेली ही अन्यायकारक वाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी केली; तसेच पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपट्टी वाढ तूर्तास स्थगित ठेवण्यात यावी, असेही सुचविण्यात आले. पाणीपट्टीची थकबाकी मोठी असल्याने ती वसूल करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जावे, असा आग्रह सदस्यांनी धरला. शहरातील पाणीपट्टीत वाढ होत असताना, शहराच्या अनेक भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यात आले.
पाणीपट्टी…
करपात्र रक्कम -२०१९-२० ची पाणीपट्टी -२०२०-२१ ची पाणीपट्टी
०००१ ते १,००० ~ १,५३३ ~ १,७६३
१,००१ ते ३,००० ~ १,७०३ ~ १,९५८
३,००१ ते ५,००० ~ १,८७५ ~ २,१५६