पुणे : पुणे महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या आणि एकूणच भाजपच्या सत्तेला नेहमी आव्हान देऊ पाहणाऱ्या अशी ज्यांची गणना होत होती त्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले- तेली यांची बदली आज करण्यात आली. त्यांच्या जागी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले यांच्याकडे नागपूर प्रदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शितल उगले या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या आहेत. त्यांचे पती देखील आयपीएस अधिकारी असून पुण्याच्या पोलीसदलात कार्यरत आहेत .मात्र उगले यांचा स्वभाव हेकेखोर आणि लोकप्रतिनिधींना कमी लेखणारा ,त्यांच्यावर सातत्याने संशय घेणारा असल्याचा आरोप असंख्य महिला नगरसेविकांनी देखील मुख्य सभेत केला होता. महापालिकेतील बोगस कामगारांचा पर्दाफाश ‘मायमराठी ‘ने केल्यावर उगले यांनी त्यावर ठोस पावले न उचलता दुर्लक्ष करण्याचाच कारभार केला .या शिवाय सेवकांच्या बदल्या ,त्यांचे प्रमोशन आणि विविध विकासकामे याबाबत त्यांनी सातत्याने विषय प्रलंबित ठेवण्याची भूमिका ठेऊन प्रत्येक विषयावर वादंग निर्माण केल्याचा आरोप हि होत असत . यामुळे मुख्य सभेत अनेकदा पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि अन्य नगरसेवकांनी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तंबी दिल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. भिमाले यांच्या नेतृत्त्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उगले यांच्या बदलीची मागणी 2 वेळा केली होती.मुख्यमंत्र्यांनी मात्र उगले आणि लोकप्रतिनिधी यांच्यात आज ना उद्या सुरळीत वातावरण होईल .यासाठी काही अवधी दिला .पण अखेर त्यांच्या कारकिर्दीची ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली .
शितल उगले यांच्या रिक्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावर रूबल प्रखेर- अगरवाल यांची राज्यशासनाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डी या पदाचा पदभार आहे. अगरवाल या 2008 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅचच्या अधिकारी असून रूबल यांनी या पूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर मार्च 2017 मध्ये त्यांची शिर्डी येथे बदली करण्यात आली होती.