पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे अभ्यासू नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची तर, उपमहापौरपदी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची आज, शुक्रवारी बहुमतांनी निवड करण्यात आली.या निवडणुकीतचे वैशिष्टय म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजप – शिवसेना युती तुटल्याचे पडसाद या निवडणुकीत स्पष्टपणे बघायला मिळाले. यावेळी शिवसेनेने आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले.आणि महाशिवआघाडीची अधिकृत वाटचाल पुण्यातून सुरु झाल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीतर्फे महापौरपदासाठी जेष्ठ नगरसेवक प्रकाश कदम, तर महापौर पदासाठी काँगेसतर्फे नगरसेविका चांदबी नदाफ शेख यांना संधी देण्यात आली होती. मुरलीधर मोहोळ यांना 97 मते पडली तर, काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेनेचे उमेदवार प्रकाश कदम यांना 59 मते मिळाली. या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक तटस्थ होते. पाच नगरसेवक अनुपस्थित होते. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. त्यांचे दोन नगरसेवक आज अनुपस्थित राहिले.
हे नगरसेवक निवडणुकीला अनुपस्थित
1) रेश्मा भोसले-भाजपा
2) वृषाली चौधरी -भाजपा
3)लता राजगुरु -काँग्रेस
4)रत्नप्रभा जगताप -राष्ट्रवादी
5)अश्वीनी लांडगे -एम आय एम
भाजप नगरसेवकांनी भगवे फेटे घालून भाजपचे चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घातले होते. आरपीआय ( आठवले गट) च्या नगरसेवकांनी फेटा आणि गळ्यात रामदास आठवले यांचे चित्र असलेले उपरणे घातले होते. पीठासीन अधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर होते.
तुतारी वाजवून नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले. पक्षाच्या आदेशानुसार मनसे तटस्थ राहणार असल्याचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.
महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीला शिवसेनेने साथ दिल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. राज्यातील सत्ता स्थापनेच्या निर्णयाआधीच पुण्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.
भाजपने मुरलीधर मोहोळ यांना महापौर आणि सरस्वती शेंडगे यांना प्रत्येकी 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. मोहोळ यांनी कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्याचीच परतफेड म्हणून मोहोळ यांना महापौर पदाची संधी देण्यात आल्याची कुजबुज आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान करताना आपले नाव, प्रभागाचे नाव, उभे राहून, हात वर करून मतदान घेण्यात आले.
मोहोळ यांची निवड झाल्यानंतर खासदार गिरीश बापट आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला. पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. मोहोळ यांच्या कुटुंबीयांनी यावेळी त्यांचे औक्षण केले. महापालिका परिसरात ढोल – ताशांच्या आवाजात निवडीचे स्वागत करण्यात आले.
मोहोळ यांनी पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीत मल्लविद्येचे धडे घेतले. कोल्हापूरच्या शासकीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सहा वर्ष सराव केला. राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांचे वडील किसनराव मोहोळ, चुलते रामचंद्र मोहोळ हे देखील नामवंत पहिलवान म्हणून ओळखले जातात. मोहोळ यांचे मोठे बंधू प्रभाकर आणि चुलत बंधू श्रीधर, गणेश हे देखील कुस्तीपटू आहेत.
सरस्वती शेंडगे यांना 97 तर, चांदबी हाजी नदाफ यांना 59 मते
पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांना 97 तर, काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाशिव आघाडीच्या उमेदवार चांदबी हाजी नदाफ यांना 59 मते मिळाली. शेंडगे यांची बहुमतांनी उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीतही मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ होते. शेंडगे यांची निवड जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.
मुरलीधर मोहोळ यांचा अल्पपरिचय
-45 वर्षांचे मुरलीधर मोहोळ हे भाजपतर्फे तीन वेळा नगरसेवक
– शिक्षण :कला शाखेत पदवी
-पुणे महापालीका शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून काम
-पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम
-पीएमपीएमएलचे संचालक म्हणूनही केले काम
– भाजपमध्ये युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून सांभाळली जबाबदारी
कोथरूडच्या कामाचे बक्षीस
मोहोळ यांनी कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली होती. मात्र अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ‘सेफ’ मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड करण्यात आली. दुसरीकडे उमेदवारी गेल्यावरही त्यांनी लांबचा विचार करत पाटील यांचा प्रचार करण्याचा मार्ग स्वीकारला आणि आज त्यांना त्याचेच फळ मिळाल्याचे मानले जात आहे.
खा.गिरीश बापट-
शहराचे नूतन महापौर मुरलीधर मोहोळ तसेच उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे यांचे अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा आणखी जोमाने विकास होईल याची मी पुणेकरांना खात्री देऊ इच्छितो. मावळत्या महापौर मुक्ताताई टिळक तसेच उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये अनेक विकास कामे सुरू झाली आहेत. ही विकास कामे पूर्ण करूनच आणखी नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून शहराचा विकास करायचा आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजप नगरसेवक यासाठी सतत प्रयत्नशील राहतील असा मला विश्वास आहे.