पुणे – येत्या काही महिन्यात जगभरातील कोविड प्रतिबंधक काही लसी भारतात येण्याची अपेक्षा आहे हे लक्षात घेऊन कोल्ड स्टोअरेजसह पुरवठा साखळीचे नियोजन करावे अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कोविड परिस्थिती आढावा बैठकीत काल (शुक्रवारी) केली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या या बैठकीत आमदार शिरोळे यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
लसींचे वाटप, शहरनिहाय वितरण, आगामी नियोजन याची माहिती देणारा राज्याचा डॅशबोर्ड करावा या मागणीचा आमदार शिरोळे यांनी पुनरुच्चार केला.
बऱ्याच रुग्णालयात कोविड केअर सेंटर आणि लसीकरण केंद्र एकत्रच असतात. अशी ठिकाणे साथ पसरविणारे हॉटस्पॉट ठरत आहेत. याकरिता रुग्णालयापासून काही अंतरावर लसीकरण केंद्र असणे अनिवार्य करावे, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने हे मॉडेल यशस्वीरीत्या अमलात आणले आहे असे शिरोळे यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांना व्यवसायाचे नियोजन करणे सोपे जाईल आणि नागरिकांमधील अनिश्चितता दूर होईल अशा पद्धतीने अनलॉकचे नियोजन करावे अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली.