पुणे : लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. डी. के. घोसाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. घोसाल हे गेल्या 28 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. भुवनेश्वर येथील सैनिक शाळा, आसाम येथील गोलपारा आणि सातारा येथील सैनिक शाळेत त्यांनी विविध पदावर काम केले आहे. लोकसेवामध्ये रुजु होण्यापूर्वी कोल्हापूर येथील संजीवन नॉलेज सिटीमध्ये ते संचालक म्हणून काम पाहात होते.
डॉ. डी. के. घोसाल यांची कारकीर्द अनेक शैक्षणिक उपक्रम राबविल्याने गाजली आहे. यामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे. ‘बेस्ट बायोलॉजी टीचर’ म्हणून त्यांना 2012 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आऊटस्टँडिंग प्रिन्सिपल म्हणून 2016 मध्ये त्यांना कन्याकुमारी येथे गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील ग्लोबल लीडर फाउंडेशन एज्युकेशन कौन्सिल ऑफ इंडियातर्फे ‘बेस्ट प्रिन्सिपल’ म्हणून 2016 मध्ये गौरविण्यात आले. तसेच, नवी दिल्लीच्याच एकेसतर्फेही त्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. डी. के. घोसाल यांच्या आतापर्यंतच्या सेवेदरम्यान 179 विद्यार्थी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये निवडले गेले. याबरोबरच शिक्षक प्रशिक्षणासाठीच्या विविध उपक्रमांसाठी त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मार्गदर्शन केले आहे.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी डॉ. डी. के. घोसाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.