पुणे, दि. २८ एप्रिल: नृत्य भक्ती फाउंडेशन संस्थेचा वर्धापन दिन आणि जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून भाव प्रवाह ही नृत्य धाराचे आयोजन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. भरतनाट्यम नृत्यातील अतिशय निवडक आणि मनमोहक रचनांवर या भाव प्रवाहाचा उलगडा केला जाणार आहे. डेक्कन जिमखाना येथील सावरकर सभागृह येथे सायंकाळी ६ ते ७:३० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
भरतनाट्यम नृत्यावर आधारित अनेक पैलूंवर नृत्य रचना सादर केल्या जाणार असून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आयोजिला आहे. त्यातील पहिले पर्व नृत्याचे आद्य दैवत नटराज, शिव, आदिशक्ती,योगी, अर्धनारी नटेश्वर, संहारक, तांडवकरी, भोळा सांब सदाशिव, अशा शिवरुपाची साधना ‘आदियोगी’ या पर्वातून सादर केली जाईल. संपूर्ण भारतात आणि भारता बाहेर ही परिक्रमा करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे नृत्यांगना सई परांजपे म्हणाल्या.