पुणे, २२ सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पक्षपाती असून सत्ताधाऱ्यांना एक न्याय आणि विरोधकांना दुसरा असा अजब पद्धतीने कारभार सुरू असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
मुळीक म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उद्देशून हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ४ सप्टेंबरला केले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर भाजपच्या वतीने आम्ही ६ सप्टेंबरला डेक्कन पोलीस ठाण्यात केली होती. आज डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोगले यांचे लेखी पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार राऊत यांनी केलेले विधान हे सामान्य असून त्यामुळे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला दुखावण्याचा हेतू त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे या प्रकरणी कोणताही दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा होत नसल्याचे पत्रात म्हटले आहे.’
मुळीक म्हणाले, ‘विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी १३ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाला गरीबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बॅंका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे. अशा आशयाची टिपण्णी केली होती. त्यांनी कोणाचेही वैयक्तिक नाव घेऊन टीका केली नव्हती. परंतु आज पुण्यात दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘खासदार राऊत यांना एक न्याय आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना दुसरा न्याय यामुळे महाविकास आघाडीचा पक्षपातीपणा आणि गोंधळलेली अवस्था लक्षात येते. हे सरकार वसुली सरकार असून, त्यांच्या मंत्र्यांवरील गंभीर स्वरूपांच्या आरोपांनी ते भांबावून गेले आहेत. त्यामुळे भांबावलेल्या अवस्थेत सूड भावनेने सरकार विरोधी पक्षांवर टीका करीत आहे. सरकारचे हे राजकारण जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. या अन्यायकारी सरकारला जागा दाखवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. शहर भाजपच्या वतीने आम्ही सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा निषेध करतो.’