अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी
पुणे-लॉक डाऊन च्या काळात म्हणजे परवा रात्री पुण्याजवळील कुडजे येथील लबडे फार्म हाउस येथे छापा टाकून येथील डान्सबार मध्ये सापडलेले महापालिकेचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्या महापालिकेतील कामकाजाची कसून चौकशी करावी तत्पूर्वी संबधित अधिकाऱ्याला निलंबित करावे , महापालिका स्तरावरदेखील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना लेखी पत्र देऊन केली आहे . पहा नेमके त्यांनी या पत्रात काय म्हटले आहे.
प्रति,
मा. आयुक्त ,पुणे महानगरपालिका,पुणे.
विषय :- कुडजे गांवातील फार्म हाऊसवर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये सापडलेले पुणे मनपाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे बाबत. …
मा. महोदय,वरिल विषयास अनुसरून काल उत्तम नगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कुडजे गांवातील एका फार्महाऊसवर पोलीसांनी छापा टाकून तेथे बेकायदेशिर पार्टी करीत असताना काही डान्स बारमधील मुली, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व पुणे महानगरपालिकेचे नोंदणीकृत ठेकेदार यांना अटक करून त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे समजते. वास्तविक पाहता या कोरोनाच्या महामारीत सरकारचे कडक नियम असताना तसेच संचारबंदीचा नियम असताना ही सगळी मंडळी त्या ठिकाणी कसे गेले, विशेषत: या मनपाच्या अधिकाऱ्यांवर स्वॅॅब सेंटरची जबाबदारी आहे त्यांनी बेजबाबदारपणे वागून हे कृत्य करणे पुणेमहानगरपालिकेच्या प्रतिमेस अशोभणीय आहे.गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नागरिक, अनेक सामाजिक संस्था, नगरसेवक यांनी पुणे मनपामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर चालू आहे व कामे न करता बिले काढण्याचे प्रकार चालू आहे याच्या विषयी तक्रारी केल्या आहेत. नुकतेच पुणे मनपाच्या वार्षिक ताळेबदं (मार्च एडिंग) चे अनेक बिले मान्य होऊन ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात धनादेश प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या कालच्या पोलीसांच्या छाप्यामुळे पुणे मनपाच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाला पृष्ठी मिळत आहे असे वाटते.तरी आम्ही आपणास या पत्राद्वारे विनंती करीत आहोत की, वरील ठिकाणी पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात जे अधिकारी सापडले त्यांना तातडीने निलंबित करावे, या पार्टीमध्ये अजून कोण कोण सहभागी होते याचा तपास करावा व जे ठेकेदार त्या ठिकाणी होते त्यांच्या सर्व कामांची तपासणी करून त्यांचा दर्जा व त्यांना अदा केलेली बिले याची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. आपण केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल आम्हास द्यावा व संपूर्ण प्रकरणाची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती
आपला
अविनाश बागवे