पुणे-मराठी सिने नाट्य सृष्टीतील लॉबी,फसवेगिरी याबाबत चर्चा घडू लागली असताना महापालिकेच्या नाट्यगृहांचे खाजगीकरण करण्याचा डाव आखला जातो आहे . या पूर्वीच महापालिका नाट्यगृहे ठराविक धेंडांच्या नावे तारखा ठेऊन त्यांचा काळाबाजार होत असल्याच्या चर्चा अनेकदा झडल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आता नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जातोय .नाट्यगृहंचे खाजगीकरणकरू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. नाट्यगृह हे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे साधन किंवा माध्यम नाही. ही पुणेकरांना सांस्कृतिक कार्यक्रम देण्याची सेवा आहे. प्रशासनाला उत्पन्न वाढविण्याची इच्छा असेल तर अनेक विभाग आहेत. त्या विभागाची वसुली करण्याकडे लक्ष द्यावे. असेही त्यांनी म्हटले आहे.
नाट्यगृहांच्या खासगीकरणाच्या निर्णयामुळे सांस्कृतिक वसा जोपासलेल्या तसेच सांस्कृतिक क्षेत्रात हयात घालविलेल्या कलावंतांचा अपमान आहे. त्यामुळे आमचा नाट्यगृहांच्या खाजगिकरणाला विरोध असल्याचे विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांनी सांगितले.
त्या संदर्भात त्यांनी नाराजी दर्शविणारे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.नाट्यगृहांच्या खाजगिकरणामुळे महापालिकेचे अस्तित्व संपून ठेकेदाराला महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे मनमानी कारभार सुरू होईल. स्थानिक नाट्य संस्था आणि कलावंतांना नाट्यगृहांत कार्यक्रम राबविण्यासाठी सध्याची सोयीस्कर पध्दत बंद होईल.
साफसफाई किंवा इतर गोष्टी खाजगी संस्थांकडून नीट सांभाळल्या गेल्या नाहीत तर त्यांना जाब कोण विचारणार? नाट्यगृहांच्या विकासासाठी पुणे महापालिकेला लक्ष घालावे लागणार असेल तर खाजगिकरण करण्याचा हा कुटील डाव का? असे अनेक सवाल दीपाली धुमाळ यांनी उपस्थित केले आहेत.