पुणे- शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच प्लाझ्माची गरज भासणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण मोठे आहे. दुर्देवाने प्लाझ्मा डोनशनबाबत उदासीनता आहे. त्यावर उपाय म्हणजे महापालिकेने प्लाझ्मा सेल करणे, हा आहे. कारण महापालिकेकडे कोरोनातून डिश्चार्ज झालेल्या रुग्णांची मोबाईल क्रमांकांसह माहिती आहे. त्यामुळे या सेलमधून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा डोनेशनसाठी तयार करता येऊ शकते. त्यासाठी महापालिकेला फारसा खर्च येणार नाही अन मनु्ष्यबळही फारसे लागणार नाही. काही स्वयंसेवी संस्थाही महापालिकेला त्यासाठी मदत करू शकतील.
सहजपणे करता येणाऱ्या गोष्टींची महापालिकेने अंमलबजावणी केली तर शहरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळू शकतो. त्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांना गुरुवारी (22एप्रिल) निवेदन दिले आहे. यावेळी आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत त्वरीत अशी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे आश्वासन दिले.
पश्चिम महाराष्ट्र मनाली भिलारे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक भय्यासाहेब जाधव, प्रदेश सरचिटणीस स्नेहल शिनगारे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गितांजली सारगे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सोनाली गाडे, शिवानी माळवदकर, विणा कात्रे, ऋृतुजा शिर्के आदि उपस्थित होते.