‘आगामी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह रहा’ : राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यशाळेत तज्ज्ञांचा कानमंत्र
पुणे :
‘सोशल मीडिया’ मध्ये वेबसाईट, फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अप असे अनेक पर्याय असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवर अधिक भर द्यावा, राष्ट्रवादी काँग्रेस ने केलेली विकासकामे, त्यामागचा दृष्टिकोन आणि विचार सर्वत्र पोहोचवावेत’ असा कानमंत्र आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सोशल मीडिया’ कार्यशाळेत देण्यात आला.
निसर्ग मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी झालेल्या या कार्यशाळेला नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अॅड.वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया तज्ज्ञ सिद्धेश भोबे यांनी मार्गदर्शन केले.
‘सोशल मीडिया’ यामध्ये राष्ट्रवादी नगरसेवक, कार्यकर्ते मागे नाहीत, मात्र सर्वांचा एकमुखी प्रसार होण्यासाठी आवश्यक तंत्र आणि मंत्र या कार्यशाळेत सांगण्यात आले. आगामी निवडणुकीत नागरिकांशी थेट संपर्काबरोबर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. सोशल मीडिया वापराबाबतचे शहरातील सर्व नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठीही या माध्यमाचा उपयोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नगरसेवकांना त्यांनी केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे माध्यम अधिक उपयुक्त ठरते आहे. त्यामुळे ‘आगामी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह रहा’ असे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.