पुणे- महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी च्या ज्येष्ठ नगरसेविका दीपाली बाबा धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. या पदासाठी माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, अश्विनी कदम, नगरसेवक योगेश ससाणे, सचिन दोडके इच्छुक होते. अशा अनेक नामांकित आणि सभागृहात वादळी भाषणे करीत आपली भूमिका मांडणाऱ्या अनेक मान्यवरांच्या स्पर्धेतून सामन्य नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या दीपाली धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.यामुळे सर्वांनांच आश्चर्याचा धक्का बसला .आगामी काळात 1 – 1 वर्षे हे पद असणार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दिलीप बराटे यांना वर्षभरासाठी हे पद देण्यात आले होते.
तर, पक्षाने माझी निवड केल्याने आभारी असून, आगामी काळात शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले. यावेळी पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, अरुण पाटील उपस्थित होते. धुमाळ यांचे मुळगाव रायगड तालुक्यातील पाली-सुधागड हे असून त्यांचे शिक्षण बीएससीच्या द्वितीय वर्षापर्यंत झाले आहे. त्यांच्या नियुक्तीमागे ‘रायगड’ कनेक्शन असल्याचे बोलले जात असून राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्याशी असलेली बाबा धुमाळ यांची जवळीक उपयोगी ठरल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक बोलत आहेत.