पुणे- महानगरपालिकेच्या जायका प्रकल्पाच्या निविदेमध्ये सत्ताधारी भाजपा ने ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत आज महापालिका भवनाच्या प्रवेश द्वारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील व विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले भाजपा पुणे महानगरपालिकेत सत्तेवर आल्यापासून फक्त भ्रष्टाचार हेच काम चालले आहे.प्रत्येक योजनेत फक्त गोलमाल भाजपाने चालविला आहे. एकाच कंपनीने समान नावाच्या कंपन्या स्थापन करून व भाजपाशी हातमिळवणी करून जायका प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. आपण दोघे भाऊ भाऊ एकत्र मिळून खाऊ अशा प्रकारचे काम पुणे महानगरपालिकेत भाजपा व कंपन्या कडून चालू आहे. मनपा आयुक्तांना पुणे मनपा मध्ये लक्ष द्या लक्ष द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे, आयुक्त सौरव राव यांनी लक्ष नाही दिले तर आयुक्तांना पुणे महानगरपालिकेत बंदी करावी लागेल असा इशारा दिला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सताधार्यांवर टीका करताना भाजपा ने सतत पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार चालविला आहे . जायका प्रकल्पाच्या निविदेत बदल नाही केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याहीपेक्षा मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असे सांगितले. यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे,नगरसेवक ,प्रकाश कदम,लक्ष्मी दुधाने,नंदा लोणकर,नारायण लोणकर ,नितीन कदम गणेश ढोरे,पूजा कोद्रे,समन्वयक राकेश कामठे, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे,प्रदीप देशमुख,युवक अध्यक्ष महेश हांडे,ओबीसी अध्यक्ष संतोष नागरे,विद्यार्थी अध्यक्ष विशाल मोरे, युवती अध्यक्ष अश्विनी परेरा,बाबासाहेब गलांडे,फहीम शेख,गणेश नलावडे,मनोज पाचपुते, दत्ता सागरे, आपा जाधव, संतोष डोख तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.