पुणे- कॉंग्रेसचे नेते आबा बागुल , शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार ,विशाल धनवडे यांनी घरच्या घरी विसर्जन आणि फिरते हौद या भाजपच्या आणि पुण्याच्या महापौरांच्या भूमिकेला विरोध करत हौदात सामाजिक अंतर राखत व नियम पाळून नेहमीप्रमाणे गणेश विसर्जन व्हावे अशी मागणी लावून धरली असताना राष्ट्रवादी च्या खासदार वंदना चव्हाण यांनी मात्र भाजपची आणि महापौरांच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारे पत्रक काढले आहे. नागरिकांना काही लोकांकडून सार्वजनिक हौदांची मागणी होत आहे. परंतु माझी आपणांस विनंती आहे.महानगरपालिकेने सूचना दिल्याप्रमाणे घरीच विसर्जन करावे असे आवाहन करणारे पत्रक आज प्रसिद्धीस दिल्याने महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊन या प्रकाराचा राजकीय लाभ उठवत राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिलेल्या योग्य प्रतिसादाबद्दल महापौरांच्या गटाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येते आहे.
हीच ती वेळ आहे, शहाणे होण्याची आणि जबाबदारीने वागण्याची !!
नेमके काय म्हटले आहे ,राष्ट्रवादी च्या खासदार वंदना चव्हाण यांनी आपल्या पत्रात हे जसेच्या तसे वाचा …..
समस्त पुणेकर नागरिकांस,
स.न.वि.वि.
आशा करते कि आपण सर्व खुशाल आहात !
पुणे शहरात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शहरातील सर्वच वातावरण मंगलमय होऊन जाते आणि हे बघायला व अनुभवायला पुण्यातील नागरिकच नव्हे तर इतर गावातील, राज्यातील आणि विविध देशातील नागरिकसुद्धा ह्या काळात आपल्या शहराला भेट देत असतात.
यंदा २२ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. एका वेगळ्या वातावरणात ह्या वेळेस गणरायाचे आपल्याला स्वागत करायला लागणार आहे. ह्यावेळेस तर विघ्नहर्त्याचे पूजन अजूनच मनोभावे होणार आहे. संपूर्ण देशाला कोरोनाने ग्रासलेल्या शहरांपैकी सर्वात उच्चांक गाठलेले आपले शहर आहे. या अती सूक्ष्म विषाणूने जगभरातील मानव जातीला चांगलाच धडा शिकवला आहे.
अनेक पुणेकरांनी या महामारीत आपले जीव गमावले, अनेकांच्या उत्पन्नाची साधने बंद झाली, अनेकांना फार मोठ्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले अजूनही परिस्थिती फारशी सुधारलेली दिसत नाही – अश्या वेळेला अतिशय जबाबदारीने काही बंधने स्वतःवर घालून घेणे गरजेचे आहे.
सार्वजनिक गणेश मंडळानी स्वतःहून पुढाकार घेऊन यंदा मंडप उभारणार नाही असे ठरवले आहे – एक पुणेकर या नात्याने त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.
महानगरपालिकेने घरात पुजलेली गणेशमूर्ती आपल्या घरीच विसर्जित करा असे आवाहन केले आहे याला काहीं विरोध करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विरोध अवाजवी व नागरिकांच्या आरोग्याला घातक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती तसेच त्यावर असलेल्या विषारी रासायनिक रंगामुळे नदीत प्रदूषण होते हे सिद्ध झालेले आहे आणि म्हणूनच शासनाने गणेश मूर्तींचे विसर्जन नदीत अथवा वाहत्या पाण्यात करू नये या अनुषंगाने कायदा केला.
आपल्या शहरातून वाहणारे पाणी पुढे दुसऱ्या गावात पिण्यासाठी वापरले जाते याचे भान असल्याने महापालिकेने नदीपात्राजवळ ठिकठिकाणी विसर्जनासाठी हौद उभारले – या निर्णयाला पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींनी व नागरिकांनी कृती संदेश दिला. आज कोरोना सारख्या महामारीला सामोरे जाताना पुन्हा एकदा पुरोग्रामीकृतीची गरज भासत आहे. काही लोकांकडून सार्वजनिक हौदांची मागणी होत आहे. परंतु माझी आपणांस विनंती आहे – आपण सर्वांनी यंदाचा गणेशोत्सव जबाबदारीने पार पाडावा यासाठी काही सूचना निवेदनाद्वारे करीत आहे :
१) शाडू मातीच्या मूर्तीचे पूजन करावे, जेणेकरून मूर्तीचे विघटन नैसर्गिकदृष्ट्या होते.
२) प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती असल्यास महानगरपालिकेने सूचना दिल्याप्रमाणे घरीच विसर्जन करावे.
३) घरी गणरायाची होणारी आरास देखील पर्यावरणपूरक वस्तू, साधन सामुग्रीने करावी.
४) जमल्यास सर्वात उत्तममार्ग की, आपल्या घरी असलेल्या धातूच्या मूर्तीचे पूजन करावे, सोबत एखाद्या सुपारीचे पूजन करावे.
५) सार्वजनिक ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे आणि गेल्यास शासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे व अटींचे पालन करावे.
कोरोनाच्या महामारीबरोबरच जागतिक तापमानवाढीचे संकट आपल्याला भेडसावत आहे. आपल्या भावी पिढीला आरोग्यदायी जीवन द्यायचे असल्यास हीच ती वेळ आहे, शहाणे होण्याची आणि जबाबदारीने वागण्याची !!
मी मनोकामना करते कि हे कोरोनाचे संकट लवकर टळू दे आणि पुन्हा एकदा आपले जीवन सुरळीत होऊ दे.
कळावे,
आपली,
वंदना चव्हाण