महापालिकेच्या जागेवर परस्पर स्वखर्चाने डेव्हलपमेंट बेकायदा ..महापालिका प्रशासनाने केला खुलासा ,म्हटले हा जागा बळकाविण्याचा आणि प्रशासकीय अधिकारावर गदा आणण्याचाच प्रयत्न
पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यावर एक उद्घाटन सोहळा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. शिंदे यांच्या हस्ते पुण्यात होणाऱ्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हे नामकरण नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्याने हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर एक संबंधित उद्यान तयार करण्यात आले आहे. त्याला शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी त्या उद्यानाला ‘एकनाथ शिंदे’ यांचे नाव दिले होते. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा सर्व खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती, असाही त्यांनी दावा केला होता. मात्र विना कारण होणारा वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने उद्घाटन कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती आहे.