पुणे -शहरातील कोरोनाचे थैमान, नागरिकांच्या समस्या सोडविताना नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी ,प्रशासनाला हवे असलेले सहकार्य ,आणि प्रशासनाच्या मर्यादा यावर कोणत्याही प्रकरची माहिती न देता ,चर्चा न करता ,आज कोरोनाच्या संसर्गाचेच कारण देऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन महिने सभा होऊ शकलेली नसताना तिसऱ्या महिन्यातील सभा आज बहुमताच्या आधारावर तहकूब केली .
महापौर मुरलीधर मोहोळ यांसह, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सभागृहात येण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ केले तसेच स्क्रीनिंग करून मनपात दाखल झाले. सभागृहात प्रत्येक नगरसेवक करिता सोशल डिस्टंन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी शहराच्या सद्यस्थितीवर प्रशासन कशाप्रकरे काम करत आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. अशी विरोधकांकडून मागणी करण्यात आली. मात्र महापौरांनी आपण मोठ्यासंख्येने एकत्र जमलो आहोत, कोरोना संसर्गाच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे सांगत चर्चा करण्यास नकार दिला.सोशल डिस्टंसिंग पालन करून झालेल्या सभेत महाविकास आघाडीने गेल्या तीन महिन्यात कोरोनावर झालेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, खूप वेळ नगरसेवकांनी एकत्र बसायला नको, या सबबीखाली सत्ताधाऱ्यांनी मुख्य सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. त्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला. विरोधी पक्षांनी कोरोनाच तारतम्य ठेवायला हवं, असा टोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना लगावला.
सुरु झालेला पावसाळा,त्या अनुषंगाने घरपडी,पूर अशा निर्माण होऊ शकणार्या आपत्ती , पुणे महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने 6 मीटर रुंदीचे सर्वच रस्ते ९ मीटर रुंद करून त्यावर टीडीआर देण्याचा बहुमताने संमत केलेला प्रस्ताव आणि त्याला राज्य सरकारने दिलेली स्थगिती ,महापालिकेतील कंत्राटी कामगारांची आर्थिक बिघडलेली अवस्था या सर्वांवर मुख्य सभेत भाजप सह सर्वच नगरसेवकांना विविध प्रश्न सतावित असताना अशा कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही . सभागृह नेते धीरज घाटे यांनी मान्यवरांच्या निधनानिमित त्यांना श्रद्धांजली वाहून हि सभा तहकूब करावी असा प्रस्ताव दिला पण त्यास विशाल तांबे , अरविंद शिंदे, अविनाश बागवे आदींनी अगोदर गरजेच्या अत्यावश्यक प्रश्नांवर चर्चा होऊ द्यात अशी मागणी करत तहकुबीला विरोध केला यावेळी नगरसचिव सुनील पारखी यांनी मतदान घेऊन भाजपच्या सदस्य संख्येच्या बहुमताने सभा तहकूब केली