पुणे- लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेल्या प्रतिबंधित झोन मधील गरिबांना घरपोच अन्न धान्याचे किट वाटपात मोठ्या गमतीदार गोष्टी घडत आहेत . अशीच एक ,मजेदार गोष्ट सहकार नगर पद्मावती – परिसरात घडली . वाटपासाठी आलेले १३४ किट विणकर सोसायटीच्या सभागृहात ठेवले आणि चक्क त्यांना पाय फुटले … ते गायब झाले याबाबतची तक्रार पोलिसात जाताच तक्रार नोंदवून घेण्याआगोदर पोलिसांच्या कुशल तपासाच्या चतुराईने त्यांचा ठावठीकाणा जणू लागला आणि हे किट पुन्हा जागेवर येवून बसले . आता या कीट ची हि धावाधाव कोणामुळे झाली ,दोषी कोण ? या गोष्टींचा उलगडा देखील झाला असेल. पण पोलिसांची चतुराई दोषींना नडणार आणि सोडणार कि अडकवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
मात्र याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली नाही .याबाबत अद्यापही पोलीस आणि महापालिका अधिकारी यांची भूमिका , त्यांच्याकडील अधिकृत माहिती मिळू शकली नाही.या प्रकरणाची हकीकत अशी कि , विणकर सभागृहात ठेवलेले १३४ कीट गायब झाल्याचे १२ जून ला केलेल्या पाहणीत समजले म्हणून त्यानुसार महापालिकेच्या धनकवडी ,सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी सहकारनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना १३ जूनला पत्र देवून गुन्हा नोंदविण्याची विनंती केली . पण पत्र पोलिसांनी स्वीकारले नाही आणि गुन्हाही नोंदवून घेतला नाही म्हणून नितीन कदम या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कॉंग्रेसच्या अमित बागुल यांनीही आज या पत्राच्या फोटो कॉपिसह काही माध्यमांना विणकर सभागृहातून १३४ किट चोरीला गेल्याची माहिती दिली . याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली .या प्रकरणी गुन्हा नोंदवा अशी मागणी करूनही पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाहीत अशी तक्रार हि कदम यांनी केली .
आणि नंतर सोशल मिडीयावर ..हा चोर कोण .. असा ओरडा सुरु झाला . आणि कॉंग्रेस राष्टवादी च्या पदाधिकाऱ्यांनी हा ओरडा सुरु केल्याने साहजिक भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले . या दरम्यान ना पोलिसांनी, ना महापालिकेने माध्यमांना आपली भूमिका अगर माहिती देण्याची तसदी घेतली, ना फोन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीना प्रतिसाद दिला .मात्र तोवर सीसीटीव्ही फुटेज हि व्हायरल झाले.
एक तर महापालिका सहायक आयुक्तांचे पत्र आणि हे फुटेज या आधारावर मग साहजिक भाजपच्या नगरसेवक असलेल्या महेश वाबळे यांच्याकडे विचारणा केली असता ,त्यांनी सांगितले कि ,कीट चोरीला गेलेच नाहीत . विणकर सभागृहात किट होते, त्या जागेवरच आता आहेत . हे कीट महापालिकेच्याच एका अभियंत्याने विणकर सभागृहात अडचण होऊ लागल्याने सहकार नगर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या आंबेडकर क्रीडा संकुलात नेऊन ठेवले होते . मात्र त्याची कल्पना धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना नव्हती .त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवा म्हणून पत्र पाठविले . पण ते पत्र तिथे पोहोचताच हे कीट महापालिकेच्याच मालकीच्या संकुलात ठेवल्याचे त्यांना तिथे समजले म्हणून त्यांनी ते पत्र तिथे दिले नाही . व त्या पत्राच्या फोटो कॉपीचा दुरुपयोग करून विरोधकांनी मात्र राजकारण सुरु केले .त्यामुळे वाद नको म्हणून पालिकेनेच आता ते सर्व कीट पुन्हा विणकर सभागृहात आणून ठेवलेले आहेत . यात विषय एवढाच आहेत कि हे कीट २४ मे पासून येथे आहेत ते वाटप करायला हवे होते ,ते एवढ्या दिवसात खराब झाले नसतील काय ? असा सवाल हि त्यांनी केला . आणि महापालिका अधिकाऱ्यांमधील असमन्वयाचा फायदा घेवून कोणी राजकारण करू नये असे म्हटले आहे. एकूणच या प्रकरणात विणकर सभागृहात १३४ किट २४ मे पासून का ठेवले ? सहायक आयुक्तांनी १२ जूनला तिथे पाहणी केल्यावर ते तिथे नव्हते तर तत्क्षणी पोलिसात तक्रार दाखल का केली नाही ? १३ जूनला पत्र देवूनही पोलीसांनी तक्रार का दाखल करवून घेतली नाही याचे उत्तरे देणे अपेक्षित होते मात्र त्यांचा संपर्कच होऊ शकला नाही . पोलिसांनी हि जर सहायक आयुक्तांचे पत्र येताच गुन्हा दाखल का करून घेतला नाही . आणि गुन्हा दाखल करून नंतर चौकशी करण्या अगोदरच या गायब झालेल्या कीट चा कसा छडा लावला ? मग त्यांना त्यात दोषी कोणी सापडले किंवा नाही ? नेमके या प्रकरणात काय घडले.. या बाबींची माहिती स्पष्ट करणे अपेक्षित होते. मात्र या दोन्ही स्तरावरून या बाबी स्पष्ट न झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते.