पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदीन सफाई व देखभाल दुरूस्ती यापुढे ठेकेदारांमार्फत-टेंडर काढणार
पुणे-पालखी सोहळ्यादरम्यान शहरात २० ठिकाणी वारकर्यांना औषधोपचाराची सुविधा करण्यात येणार असून याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस देण्यात येईल.
तसेच शहरातील शाळांमध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठी शाळांच्या मागणीनुसार लसीकरणाचे कॅम्पही भरविण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
आषाढी वारीनिमित्त पुढील आठवड्यात शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्या येणार आहेत. पालखी मार्गावर तसेच मुक्कांमांच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेसोबतच पाणी व आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने २० ठिकाणी औषधोपचारांची सुविधा करण्यात येणार आहे. याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्यांना कोरोनावरील लसीचा मोफत बूस्टर डोसही देण्यात येणार आहे. बूस्टर डोससाठी वारकर्यांनी आधार कार्ड आणि दोन डोस घेतल्याचे सर्टीफिकेट सोबत ठेवल्यास लसीकरणाची प्रक्रिया अधिक सोपी होईल, असे आवाहनही कुमार यांनी केले आहे.
सध्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज नवीन १९३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरीत सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे असून घरीच उपचार घेत आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यात येणार आहे. प्रामुख्याने १२ वर्षावरील शालेय मुलांचे लसीकरण करण्यासाठी शाळांमध्येच लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शाळांकडून आलेल्या मागणीनुसार वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.
शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दैनंदीन देखभाल दुरूस्तीची कामे यापुढे खाजगी ठेकेदारांमार्फत केली जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
विक्रम कुमार यांनी सांगितले, की शहरात एक हजार २०० सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. सध्या महापालिकेच्या माध्यमातुन या स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल दुरूस्ती करण्यात येते. परंतू यानंतरही स्वच्छतागृहांबाबत सातत्याने तक्रारी येतात. यामध्ये प्रामुख्याने सकाळी एकवेळेसच स्वच्छता, देखभाल दुरूस्तीच्या कामांना विलंब होत असल्याने वापर न होणे अशा तक्रारींची संख्या अधिक आहे. यासाठी स्वच्छता गृहांची दैनंदीन स्वच्छता व देखभाल दुरूस्तीची कामे ठेकेदारांमार्फंत करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदीन सफाई व देखभाल दुरूस्ती यापुढे ठेकेदारांमार्फत– विक्रम कुमार
महापालिकेच्या पाचही झोनसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहेत. याकरिता स्वच्छतेसाठी ५ कोटी रुपये आणि देखभाल दुरूस्तीसाठी ४ कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत क्षेत्रिय कार्यालय पातळीवर मॉनिटरींग करण्यात येईल, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.जाहिरातींच्या हक्काच्या बदल्यात अत्याधुनिक सुविधा असलेली एअर कंडीशनयुक्त सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची तयारी काही कंपन्यांनी दाखविली आहे. यासाठी प्रायोगीक तत्वावर एका सार्वजनिक स्वच्छतागृहाची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील ड्रेनेज लाईन व चेंबर सफाईची कामे दोन मोठ्या मशिन्सद्वारे सुरू आहेत.
तसेच अंतर्गत ड्रेनेज लाईन सफाईसाठी जेटींग मशीन्सचा वापर करण्यात येत आहे.
मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज सफाईची कामे मोठ्या मशिन्सद्वारे करण्यात येणार आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामांना गती देण्यात आली आहे, अशी माहितीही विक्रम कुमार यांनी दिली.