पुणे, दि. 19 ऑगस्ट 2020 : ग्राहक संवादासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणकडून पुणे प्रादेशिक विभागात पहिल्या टप्प्यात ‘व्हॉटस् अॅप’चे सुमारे 7 हजार 350 ग्रुप तयार करण्यात येत त्याद्वारे सुमारे 18 लाख 37 हजार वीजग्राहकांशी नियमित संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे 2800 ग्रुपद्वारे सुमारे 7 लाख वीजग्राहकांचा समावेश करण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या संपर्कात राहून थेट प्रादेशिक संचालक ते जनमित्रांकडून नियमित ग्राहक संवाद साधण्यासाठी, अडीअडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी महसूलनिहाय प्रत्येकी साधारणतः 250 वीजग्राहकांचा ‘व्हॉटस् अॅप’चे ग्रुप तयार करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहे.
पुणे प्रादेशिक विभागातील महत्वाच्या व मोठ्या वीजग्राहकांसाठी प्रादेशिक विभागस्तरावर प्रादेशिक संचालक, परिमंडलस्तरावर मुख्य अभियंता यांच्याकडून ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुपद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. यासह अधीक्षक अभियंता ते शाखा अभियंते हे सर्व कार्यालयप्रमुख तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनमित्रापर्यंत प्रत्येकी एक ग्रुप तयार करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात महावितरणचे रास्तापेठ, गणेशखिंड तसेच पुणे ग्रामीण व बारामती या चार मंडल कार्यालयांसह 15 विभाग, 53 उपविभाग आणि 233 शाखा कार्यालय आहेत. यासोबतच प्रत्येक जनमित्रांपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे ग्रुप तयार करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे सुमारे 2800 ग्रुपच्या माध्यमातून सुमारे 7 लाख 16 हजार वीजग्राहकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
या ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुपमधील वीजग्राहकांमध्ये उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसह सर्व वर्गवारीतील ग्राहक, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी, वाणिज्यिक संकुल पदाधिकारी, महत्वाचे ग्राहक, लघुउद्योजक संघटना प्रतिनिधी, औद्योगिक वसाहत संघटना पदाधिकारी, एमआयडीसी वाहिन्यांवरील ग्राहकांचा समावेश राहील. तर प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनमित्रांकडून तयार करण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये इतर ग्राहकांसोबतच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, वाड्यावस्त्यांमधील काही ग्राहकांचा देखील समावेश करण्यात येत आहे. यामध्ये सरपंच/उपसरपंच/ग्रामसेवक हे देखील ग्रुप अॅडमिन होऊ शकणार आहेत. याव्यतिरिक्त इतर ग्राहकांना व्हॉटस् अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेण्याची व आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक ग्रुप तयार करण्याची मुभा संबंधीत अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
या ग्रुपद्वारे विविध वीजपुरवठा बंद असल्याचे कारण व सुरु होण्याचा संभाव्य कालावधी तसेच महावितरणच्या विविध ग्राहकसेवांची व वीजसुरक्षेबाबतची नियमितपणे माहिती दिली जाईल. सोबतच ग्रुपमधील सदस्यांकडून प्राप्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती तसेच इतर विविध तक्रारींचे तत्परतेने निवारण करण्यात येईल. तथापि या ग्रुपमध्ये समाविष्ट केलेल्या वीजग्राहकांनी केवळ महावितरणशी संबंधीत माहिती, तक्रारी किंवा सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्य कोणत्याही प्रकारचे मेसेज किंवा व्हीडीओ पोस्ट करणाऱ्या ग्राहकास संबंधीत ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुपमधून वगळण्यात येणार आहे.