पुणे, : धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉटस् अॅपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. 7)पर्यंत पुणे प्रादेशिक विभागात 200 ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील 58 तक्रारींचा समावेश आहे. महावितरणकडून वीजसुरक्षेसाठी सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, रोहित्रांचे कुंपण उघडे असणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुणे परिमंडलात व्हॉटस् अॅपद्वारे आतापर्यंत 88 ठिकाणी वीजयंत्रणा धोकादायक असल्याची माहिती प्राप्त झाली. महावितरणच्या संबंधीत कार्यालयांकडून 58 ठिकाणचे दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित 30 ठिकाणी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी किंवा शिफ्टींगची गरज परंतु जागेची अडचण आदींमुळे सध्या कार्यवाही सुरु आहे. वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी व्हॉटस् अॅप क्रमांकावर माहिती देण्याच्या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
व्हॉटस् अॅपच्या मोबाईल क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून धोका असल्याची फोटोसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना कॉल करू नये. फक्त धोकादायक यंत्रणेचे स्थळ संपूर्ण पत्यासह किंवा गुगल लोकेशनसह द्यावे. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे पत्त्यासह माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच अशा तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधून माहिती देता येईल.
पुणे परिमंडलाच्या 7875767123 या व्हॉटस् अॅप क्रमांकावर प्राप्त झालेली धोकादायक यंत्रणेची फोटोसह माहिती किंवा तक्रार तात्काळ संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहे. तसेच यंत्रणेची दुरुस्ती झाल्यानंतरचे छायाचित्र पाठवून संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येत आहे. या उपक्रमाचे अनेक ग्राहकांनी स्वागत केले असून तक्रारींनुसार दुरुस्ती कामे लगेचच पूर्ण केल्याबाबतव्हॉटस् अॅपवर समाधान व्यक्त करीत आहेत.