पिंपरी, दि. 21 जून 2020 : भोसरी ए-सेक्टरमधील महावितरणचे ग्राहक मेसर्स साई प्रोफाईल यांना पाठविण्यात आलेले 8 कोटी 58 लाख 985 रुपयांचे केवळ छापील वीजबिल नजरचुकीने वितरीत करण्यात आले आहे. हे बील सदोष असल्याचे अंतर्गत संगणकीय प्रणालीतून लक्षात आले होते. ते दुरुस्त देखील करण्यात आले होते व महावितरणच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. मात्र दुरुस्ती पूर्वीचे सदोष बील नजरचुकीने छापण्यात आल्याने ग्राहकास चुकीचे वीजबिल प्राप्त झाले आहे, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भोसरी येथील मेसर्स साई प्रोफाईल (ग्राहक क्रमांक 170149073510) यांचे जून महिन्यांचे वीजबिल तयार झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे ते सदोष असल्याचे दिसून आले. या वीजबिलाची पुन्हा तपासणी करण्यात आली व दुरुस्त केलेले 85 हजार 850 रुपयांचे नवीन बिल तयार करण्यात आले. हे बील महावितरणच्या वेबसाईटवर संबंधीत ग्राहक क्रमांकासाठी अपलोड करण्यात आले आहे. मात्र, प्रिटींगसाठी पाठविण्यात येणाऱ्या वीजबिलांच्या फाईलमध्ये या ग्राहकाच्या जुन्याच सदोष वीजबिलाची फाईल नजरचुकीने पाठविण्यात आली व बिलाची छपाई होऊन त्याची प्रत संबंधीत ग्राहकास देण्यात आली. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीत ग्राहकास या चुकीच्या वीजबिलाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच दुरुस्त केलेले वीजबिल सुद्धा त्यांना देण्यात आले आहे, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.